आयपीएलच्या १३व्या हंगामातील तिसरा सामना आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे हा सामना होत आहे. विराट कोहली रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघाचे तर सनरायझर्स हैद्राबादचे नेतृत्त्व डेविड वॉर्नर करत आहे.
सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विराट नेतृत्त्व करत असलेल्या बेंगलोर संघाची देवदत्त पडिक्कल व ऍरॉन फिंच ही नवी जोडी सलामीला आली.
या सामन्यात बेंगलोरकडून सलामीला आलेल्या ऍरॉन फिंचने एक खास विक्रम केला आहे. रॉयल चॅलेंजर बेंलगोर हा त्याचा आयपीएलमधील तब्बल ८वा संघ ठरला आहे. असा विक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
फिंच यापुर्वी २०१०मध्ये राजस्थान रॉयल्स, २०११-१२मध्ये दिल्ली डेअरडेविल्स, २०१३मध्ये पुणे वॉरियर्स, २०१४मध्ये सनरायझर्स हैद्राबाद, २०१५मध्ये मुंबई इंडियन्स, २०१६-१७मध्ये गुजरात लायन्स, २०१८मध्ये किंग्ज ११ पंजाब व २०२०मध्ये रॉयल चॅलेंजर बेंलगोर अशा ८ संघांकडून खेळला आहे.
२०१३ पासून हा खेळाडू २०१९चा हंगाम सोडता प्रत्येक हंगामात खेळला आहे. त्याने विश्वचषक तयारीसाठी २०१९मध्ये आयपीएलमधून माघार घेतली होती. तो २०१३ पासून खेळलेल्या १० हंगामांपेकी त्याने ८ वेळा वेगवेगळ्या संघांकडून भाग घेतला आहे. यात तो केवळ २०११-१२ हंगामात दिल्ली व २०१६-१७ हंगामांत गुजरात अशा दोन संघांकडून दोन हंगाम खेळला आहे.