जुलै महिन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ वेस्ट इंडीज आणि बांगलादेशविरुद्ध टी२० व वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकताच १८ सदस्यीय संघ जाहीर केला. या दोन्ही मालिकांमधून ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी माघार घेतली. वरिष्ठ खेळाडूंच्या या निर्णयावर संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच याने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, त्याने उर्वरित आयपीएलबद्दल देखील सूचक वक्तव्य केले.
फिंचने खेळाडूंबाबत केले मोठे वक्तव्य
वेस्ट इंडीज आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकांमध्ये खेळण्यास ऑस्ट्रेलियाच्या काही प्रमुख खेळाडूंनी नकार दिला आहे. प्रत्येकाने यासाठी वेगवेगळी कारणे दिली. माघार घेणाऱ्या खेळाडूंमध्ये उपकर्णधार पॅट कमिन्स, डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ या वरिष्ठ खेळाडूंच्या देखील समावेश आहे.
या खेळाडूंविषयी बोलताना अॉस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच म्हणाला, “खेळाडूंच्या या निर्णयाने मी काहीसा चकीत झालो. मात्र, तो त्यांचा निर्णय आहे आणि आपल्याला त्याचा आदर करावा लागेल. परंतु, आपण आयपीएलच्या पुढील भागात खेळण्यासाठी कसे योग्य आहोत हे सिद्ध करणे या खेळाडूंना अवघड जाईल. कारण, आगामी काळात देशांतर्गत क्रिकेटची तसेच टी२० विश्वचषकाची जबाबदारी याच खेळाडूंवर असेल.” फिंचने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत मुलाखत दिली होती.
खेळाडूंनी विविध कारणांनी घेतली माघार
डेविड वॉर्नर व पॅट कमिन्स यांनी भविष्यकालीन योजनांचा विचार करता या दौऱ्यांवरून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर केन रिचर्डसन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस व डॅनियल सॅम्स यांनी वारंवार क्वारंटाईन राहिल्याने कुटुंबाला वेळ देता न आल्याचे कारण देत या दोन्ही दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला.
वेस्ट इंडीज व बांगलादेश दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ-
ऍरॉन फिंच (कर्णधार), एश्टन एगर, वेस एगर, जेसन बेहरेन्डॉर्फ, ऍलेक्स केरी, डॅन ख्रिस्टियन, जोश हेझलवुड, मोईजेस हेनरिक्स, मिशेल मार्श, रायली मेरिडिथ, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, मिचेल स्टार्क, मिचेल स्वॅपसन, ऍश्टन टर्नर, ऍन्ड्र्यू टाय , मॅथ्यू वेड व ऍडम झंपा.
महत्वाच्या बातम्या:
युवा शेफाली वर्माने रचला इतिहास, ठरली हा पराक्रम करणारी पहिली भारतीय खेळाडू
वाचाल तर वाचाल! सामना सुरू होण्याआधी न्यूझीलंडच्या खेळाडूंचा फोटो व्हायरल
WTC Final 2021: पावसाचा खेळ सुरुच राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द