टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीला शनिवारी (22 ऑक्टोबर) सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडविरुद्ध लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला 89 धावांनी पराभूत करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. या पराभवानंतर बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) याने न्यूझीलंड संघाचे कौतुक केले. तसेच उर्वरित सामन्यांमध्ये आपल्या संघाला अधिक चांगली कामगिरी करावी लागेल असे देखील म्हटले.
तब्बल 89 धावांनी झालेल्या पराभवामुळे फिंच निराश झालेला दिसला. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला,
“त्यांनी नक्कीच आमच्यावर वर्चस्व गाजवले. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या 4 षटकांमध्ये सामन्याची दिशा ठरवली. त्या आक्रमणातून आम्ही सावरलो नाही. त्यानंतर एका मोठ्या सुरुवातीची आम्हाला गरज होती, ते घडले नाही आणि आम्ही सामन्यातून बाहेर झालो. नियमित अंतराने बळी गमावल्याचा तोटा आम्हाला झाला. आम्ही पुढील सामना श्रीलंकेशी खेळणार आहे. आमचे आणखी चार सामने बाकी आहेत. ते सर्व सामने आम्हाला जिंकावे लागतील. तसेच थोडे नशिबही आम्हाला आमच्या बाजूने हवे आहे.”
या सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय न्यूझीलंड (New Zealand) संघाच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत संघाची धावसंख्या 200 धावांपर्यंत पोहोचवली. न्यूझीलंडसाठी डेवॉन कॉनवेने नाबाद 92 धावांची सर्वोच्च खेळी केली. हे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा डाव सुरुवातीपासूनच घसरला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात आपले बळी गमावले. न्यूझीलंडच्या नियंत्रित गोलंदाजीमुळे त्यांचा डाव 17.1 षटकात 111 धावांवरच संपुष्टात आला. अखेरीस न्यूझीलंडने हा सामना 89 धावांनी जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महामुकाबल्यातून पाकिस्तानचा हुकमी एक्का बाहेर! टीम इंडियाला दिलेली मोठी जखम
देशांतर्गत क्रिकेट गाजवतोय इशान किशन, ओडिसाविरुद्ध केलेले शतक ठरले ऐतिहासिक






