आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) बुधवारी (16 ऑक्टोबर) तीन दिग्गज खेळाडूंचा मोठा सन्मान केला. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स, इंग्लंडचा माजी सलामीवीर ॲलिस्टर कुक आणि भारताची माजी फिरकीपटू नीतू डेव्हिड यांचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
भारताचे अनेक माजी खेळाडू ‘हॉल ऑफ फेम’चा भाग आहेत, ज्यात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जानेवारी 2009 मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेम सुरू केला होता. त्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंचा या यादीत समावेश करण्यात आला.
एबी डिव्हिलियर्सनं आपल्या कारकिर्दीत 114 कसोटी सामन्यांमध्ये 8,765 धावा, 228 एकदिवसीय सामन्यांमध्ये 9,577 धावा आणि 78 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1,672 धावा केल्या आहेत. त्यानं एकूण 47 शतकं आणि 109 अर्धशतकं ठोकली. याशिवाय त्यानं एकूण 463 झेल घेतले आणि 17 स्टंपिंग केले. डिव्हिलियर्सनं 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
इंग्लंडचा ॲलिस्टर कुक 2006 ते 2018 या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय होता. त्यानं 161 कसोटी, 92 एकदिवसीय आणि चार टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं कसोटीत 12,472, एकदिवसीयमध्ये 3,204 आणि आणि टी20 मध्ये 61 धावा केल्या. कूकनं 38 आंतरराष्ट्रीय शतकांशिवाय 76 अर्धशतके झळकावली आहेत.
भारताच्या नीतू डेव्हिडनं 10 कसोटीत 41 तर 97 एकदिवसीय सामन्यात 141 विकेट घेतल्या आहेत. तिनं 2006 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये एकूण 10 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेले भारतीय
कपिल देव – 2009
सुनील गावस्कर – 2009
बिशन सिंह बेदी – 2009
अनिल कुंबळे – 2015
राहुल द्रविड – 2018
सचिन तेंडुलकर – 2019
विनू मांकड – 2021
डायना एडुलजी – 2023
वीरेंद्र सेहवाग – 2023
नीतू डेव्हिड – 2024
हेही वाचा –
भारत-न्यूझीलंड कसोटीवर पावसाचं सावट, मालिका ड्रॉ झाल्यास कोणाचा फायदा? जाणून घ्या
वरुणराजा थांबेना! भारत-न्यूझीलंड बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया
आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल, संघाला मिळाला नवा बॉलिंग कोच!