इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये मंगळवारी २२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावत १७१ धावा उभारल्या. आरसीबीचा प्रमुख खेळाडू एबी डिव्हिलियर्सने पुन्हा एकदा नाबाद अर्धशतक झळकावून संघाच्या धावसंख्येत मोठा हातभार लावला. या खेळीदरम्यान डिव्हिलियर्सने आयपीएल कारकिर्दीत ५००० धावांचा पल्ला पार केला. यासह त्याने एका खास यादीत आपले नाव नोंदविले.
डिव्हिलियर्स बनला पाच हजारी मनसबदार
कर्णधार विराट कोहली, देवदत्त पडिक्कल व ग्लेन मॅक्सवेल लवकर बाद झाल्यानंतर डिव्हिलियर्सने आरसीबीच्या डावाची जबाबदारी स्वीकारली. त्याने सुरुवातीला रजत पाटीदारसोबत डावाला आकार दिला. जम बसल्यानंतर त्याने दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे काढली. डिव्हिलियर्सने अखेरपर्यंत नाबाद राहून ४२ चेंडूत ३ चौकार व ५ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ७५ धावांची खेळी केली.
एबीचा नवा पराक्रम
या खेळीदरम्यान डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये ५ हजार धावा बनविणारा सहावा फलंदाज ठरला. डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये सर्वात वेगवान ५००० धावा बनविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला. डिव्हिलियर्सने १६१ डावांमध्ये ही कामगिरी केली. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान ५००० धावा बनविण्याचा विक्रम सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने अवघ्या १३५ डावांमध्ये हा पल्ला गाठला होता.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी असून त्याने १५७ डावांमध्ये पाच हजार धावा बनविलेल्या. सुरेश रैना व मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांनी अनुक्रमे १७३ व १८७ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ : आवेश खानने केली विराटची शिकार, कर्णधार झाला क्लीन बोल्ड
टी२० क्रिकेटमध्ये १२ धावांचा फटका असावा, दिग्गजाने केली मागणी
ब्रेट लीचेही पॅट कमिन्सच्या पावलावर पाऊल, भारताला केली तब्बल इतक्या रुपयांची मदत