आयपीएल 2025 चा मेगा लिलाव पुढील महिन्याच्या अखेरीस होऊ शकतो. मात्र त्याआधी भारताचा टी20 विश्वचषक चॅम्पियन कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून दुसऱ्या संघात सामील होईल, असं बोललं जातंय.
सोशल मीडियावरील काही चाहत्यांना रोहितनं विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये यावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावर आता दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सनं आपली प्रतिक्रिया दिली. जर रोहित आरसीबीमध्ये सामील झाला तर हे एक ऐतिहासिक पाऊल असेल, असा विश्वास डिव्हिलियर्सनं व्यक्त केला.
रोहित शर्माला आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सनं कर्णधारपदावरून हटवलं होतं. संघानं त्याच्या जागी गुजरात टायटन्सच्या हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलं. या निर्णयावर रोहित उघडपणे काहीही बोलला नसला, तरी तो खूश नसल्याचं त्याच्या वागण्यातून स्पष्ट होत होतं. यामुळे बोललं जातंय की, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडून दुसऱ्या संघाचा भाग बनू शकतो.
एबी डिव्हिलियर्स आपल्या यूट्यूब चॅनेलवर रोहित शर्मा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील होण्याच्या शक्यतेबाबत बोलला. डिव्हिलियर्सनं रोहितच्या मुंबईशी असेलेल्या निष्ठेचा उल्लेख केला आणि सांगितलं की तो आरसीबीमध्ये सामील होण्याची शक्यता फार कमी आहे.
डिव्हिलिअर्स म्हणाला, “रोहितबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर मला हसू आलं. जर रोहित मुंबई इंडियन्समधून आरसीबीमध्ये गेला तर ती खूप मोठी गोष्ट असेल. खूप बातम्या बनवल्या जातील. ही गुजरात टायटन्समधून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्यापेक्षाही मोठी गोष्ट असेल. पण जर रोहित आरसीबीमध्ये गेला, तर ती वेगळी गोष्ट असेल. मला नाही वाटत की तो आरसीबीमध्ये जाण्याची शक्यता 0.1 टक्के देखील आहे.”
आयपीएल 2025 साठी फ्रँचायझी जास्तीत जास्त 6 खेळाडू रिटेन करू शकते. मुंबई इंडियन्समध्ये सध्या अनेक मोठे खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत कोणाला रिटेन केलं जाणार आणि कोणाला नाही, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा त्याच्या भविष्याबाबत काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे.
हेही वाचा –
पहिल्या टी20 मध्ये भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? पिच रिपोर्ट आणि सामन्याचा अंदाज जाणून घ्या
MS Dhoni : आयपीएल 2025 मध्ये एमएस धोनी खेळणार का? मोठे अपडेट समोर
AUSW vs SLW: कांगारूंची वरचढ, आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा दारुण पराभव