दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने शुक्रवारी(१९ नोव्हेंबर) मोठी घोषणा केली आहे. तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली.
३७ वर्षीय डिविलियर्सने निवृत्ती घेतानाचा निर्णय जाहीर करताना भावुक पोस्ट लिहिली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘हा खूप अविश्वसनीय प्रवास होता, पण मी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणात मोठ्या भावांसह सामने खेळण्यापासून मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि बेलगाम उत्साहाने खेळलो. आता मी ३७ वर्षांचा झालो आहे. ज्योत आता तितकी तेजस्वीपण जळत नाहीये.’
https://twitter.com/ABdeVilliers17/status/1461590034193297409
त्याने पुढे म्हटले, ‘शेवटी, मला जाणीव आहे की माझ्या कुटुंबाने, माझे पालक, माझे भाऊ, माझी पत्नी डॅनियल आणि माझ्या मुलांनी त्याग केल्याशिवाय काहीही शक्य झाले नसते. आता मी आमच्या आयुष्यातील पुढच्या अध्यायाची वाट पाहात आहे, आता आम्ही त्याला प्राधान्ये देऊ शकू.’
याबरोबरच डिविलियर्सने सर्वांचे आभार मानताना लिहिले, ‘मी माझ्या प्रत्येक संघसहकाऱ्याचे, प्रतिस्पर्ध्याचे, प्रशिक्षकाचे आणि प्रत्येक फिजिओ आणि सपोर्ट स्टाफ सदस्याचे आभार मानतो. त्यांनी माझ्याबरोबर त्याच मार्गाचा प्रवास केलाय. दक्षिण आफ्रिकेत, भारतात, मी जिथे जिथे खेळलो तिथे मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी नम्रता व्यक्त करतो.’
https://twitter.com/ABdeVilliers17/status/1461590448879902726
https://twitter.com/ABdeVilliers17/status/1461590293602570243
‘क्रिकेट माझ्याबाबत अत्यंत दयाळू आहे, मग ते टायटन्ससाठी खेळणे असो, प्रोटियाजसाठी असो (दक्षिण आफ्रिका), किंवा आरसीबीसाठी किंवा जगात कुठेही असो. या खेळाने मला अतुलनीय अनुभव आणि संधी दिल्या आहेत, आणि मी नेहमीच यासाठी कृतज्ञ राहीन,’ असेही डिविलियर्स पुढे म्हणाला.
‘मिस्टर ३६०’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेविलियर्सने शेवटी लिहिले, ”हे वास्तव आहे आणि मला ते स्वीकारावेच लागेल, जरी हे अचानक वाटत असले तरी. म्हणूनच मी आज ही घोषणा करत आहे. मी माझा वेळ घेतला. क्रिकेट माझ्याबाबत अत्यंत दयाळू आहे.’
https://twitter.com/ABdeVilliers17/status/1461590226799939590
https://twitter.com/ABdeVilliers17/status/1461590137188622342
डिविलियर्सने मे २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण तो आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर जगभरातील विविध लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसत होता. आता त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तो अखेरचे आयपीएल २०२१ हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसला होता.
डिविलियर्सची कारकिर्द –
एबी डीविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११४ कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८७६५ धावा, वनडेत २२८ सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९५७७ धावा, तर टी२०मध्ये ७८ सामन्यात २६.१२च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटीत २ आणि वनडेत ७ विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने यष्टीरक्षण करताना २१९ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर वनडेमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
डिविलियर्सने त्याच्या कारकिर्दीत एकूण १४१ प्रथम श्रेणी सामने खेळले असून १०६८९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर २६३ अ दर्जाच्या सामन्यांमध्ये त्याने १११२३ धावा केल्या आहेत. तसेच तो त्याच्या कारकिर्दीत एकूण ३४० टी२० सामने खेळला आहे. यात १८४ आयपीएल सामन्यांचाही समावेश आहे. त्याने टी२० कारकिर्दीत ९४२४ धावा केल्या आहेत. यामध्ये आयपीएलमधील त्याच्या ५१६२ धावांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यासाठी ‘महा ड्रीम ११’; हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!
भारत-न्यूझीलंड संघातील दुसऱ्या टी२० सामन्यासाठी प्रेक्षकांची १०० टक्के उपस्थिती, पण ‘ही’ आहे अट
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत-न्यूझीलंड दुसरा टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर






