भारतीयांचं सर्वाधिक प्रेम लाभलेला दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डीविलियर्सने आंतरराष्टीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे.
त्याने हीच निवृत्तीची योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे. ‘मिस्टर360’ अशी ओळख असणाऱ्या एबीला नुकतेच सर्वांनी आयपीएलमध्ये खेळताना पाहिले. त्यावेळी कोणाला वाटले देखील नव्हते की एबी अचानक निवृत्ती घोषित करेल.
17 डिसेंबर 2004 मध्ये इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या एबीने 14 वर्ष आपल्या खेळीने आणि अफलातून फटकेबाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. पण काही दिवसांपूर्वीच त्याने ” विश्वचषक जिंकणे हे माझे अंतिम स्वप्न नाही,” असे वक्तव्य करून निवृत्तीचे संकेत दिले होते.
आज त्याने ट्वीटरवर ज्या मैदानावर एबीने पहिला क्रिकेट सामना खेळला त्याच टच क्रिकेट क्लबच्या मैदानावर निवृत्ती जाहिर केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
I’ve made a big decision today pic.twitter.com/In0jyquPOK
— AB de Villiers (@ABdeVilliers17) May 23, 2018
या व्हिडिओत त्याने म्हटले आहे की, “मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ”
“114 कसोटी, 228 वनडे आणि 78 टी20 सामने खेळल्यानंतर आता दुसऱ्यांना संधी देण्याची वेळ आली आहे. खरं सांगायच तर मी आता थकलोे आहे. ”
“हा खूप कठीण निर्णय होतो. मी यावर खूप विचार केला आणि मी चांगले क्रिकेट खेळत असताना निवृत्ती घेऊ इच्छित आहे. भारत आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध मिळवलेल्या चांगल्या विजयानंतर मला वाटते की ही योग्य वेळ आहे.”
“मी दक्षिण आफ्रिकेसाठी कोठे, कधी आणि कोणत्या प्रकारात खेळलो याबद्दल एकाची निवड करणे माझ्यासाठी अवघड आहे. माझ्यासाठी दक्षिण आफ्रिकेची जर्सीच सर्व काही आहे किंवा नाही. इतक्या वर्षात प्रशिक्षक, दक्षिण आफ्रिकेचा स्टाफचा त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहिल.”
“सगळ्यात महत्त्वचं म्हणजे माझ्या संपूर्ण काराकिर्दीतील माझ्या संघसहकाऱ्यांचे धन्यवाद. या 14 वर्षात तुमच्या पाठींब्याशिवाय मी असा खेळाडू झालो नसतो. ”
“दुसरे कुठेतरी कमाई करण्यासाठी नाही, पण असे वाटते की पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. सर्वच गोष्टींचा शेवट असतो. दक्षिण आफ्रिकेच्या आणि जगातील सर्वच क्रिकेट चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे. “
“माझ्याकडे आता परदेशात खेळण्याची कोणतीही योजना नाही. खरं तर, मला आशा आहे की मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये टायटन्ससाठी उपलब्ध असेल. तसेच मी कायमच फाफ डू प्लेसिस आणि संघाला पाठींबा देत राहिल.”
एबीने त्याचा शेवटचा अंतरराष्ट्रीय कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 30 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान खेळला.
एबी डीविलियर्सने आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेडून 114 कसोटीत 50.66च्या सरासरीने 8765, वनडेत 228 सामन्यात 53.5च्या सरासरीने 9577 तर टी20मध्ये 78 सामन्यात 26.12च्या सरासरीने 1672 धावा केल्या आहेत.