भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. पुढच्या दोन कसोटी सामन्यांतून देखील विराट माघार घेणार, अशा बातम्या समोर येत आहेत. अशात चाहते विराट आणि त्याच्या कुटुंबाविषयी चिंता व्यक्त करत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि विराटचा चांगला मित्र एबी डिविलियर्स याने विराट संघातून बाहेर असण्याचे कारण सांगितले होते. पण आता डिविलियर्सच्या विधानाची खूपच चर्चा झाल्यानंतर त्याने आपले विधान मागे घेतले आहे.
भारत आणि इंग्लंड (iIND vs ENG) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचे अंतर बाकी होते. विराट कोहली (Virat Kohli) संघासोबत सराव करू लागला होता. पण अशातच वैयक्तिक कारणास्तव इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. विराटने माघार घेण्याचे वैयक्तिक कारण नक्की काय, हे अद्याप समोर आले नाहीये. पण काही दिवसांपूर्वीच एबी डिविलियर्स (AB de Villiers) असे म्हणाला होता की, “विराट आणि अनुष्का दुसऱ्या आई-वडील होणार आहेत, ज्यामुळे विराट कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.”
डिविलियर्सचे हे विधान चाहत्यांसाठी महत्वाची माहिती देणारे ठरले आणि माध्यमांमध्ये याची प्रचंड चर्चा देखील झाली. पण आता डिविलियर्सला आपली चूक समजल्याचे दिसते. त्याने हे विधान आता मागे घेतले आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत डिविलियर्स म्हणाला, “क्रिकेट नंतर येतं. सर्वात आधी येतं ते कुटुंब आहे. माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. मी चुकीची माहिती दिली होती.” विराटने असे अचानक क्रिकेटपासून लांब राहणे अनेकांच्या मते योग्य नाहीये. त्यातही भारतीय संघ इंग्लंडसारख्या बलाढ्य संघासोबत कसोटी मालिका खेळत असताना विराट संघासोबत पाहिजे, असे चाहत्यांना वाटत आहे. पण डिविलियर्सच्या मते विराटने माघार घेणे चुकीचे नाही.
डिविलियर्स म्हणाला, “विराटला देशाकडून खेळत असताना विश्रांती घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुटुंब सर्वात आधी येतं आणि त्यानंतर क्रिकेट येतं. विराट कौंटुंबिक कारणास्तव संघातून बाहेर आहे. सथ्या तो कुठे आहे, हे कुणालाच माहीत नाहीये. पण जगभरात त्याचे जेवढे चाहते आहेत, त्यांनी त्याच्यासाठी चांगल्या पार्थना करा. त्याने विश्रांती घेण्याचे कारण काहीही असो. तो पूर्ण ताकदीने मैदानात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे.”
दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका पहिल्या दोन सामन्यांनंतर 1-1 अशा बरोबरीवर आहे. उभय संघातील तिसरा सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोटमध्ये सुरू होईल. (AB de Villiers statement on Virat Kohli’s comeback)
महत्वाच्या बातम्या –
त्रेपन्न वर्षांपुर्वी जर पैशांचा पाऊस पडला नसता, तर कदाचित ‘वनडे क्रिकेट’चे नावदेखील नसते
वाढदिवस विशेष: सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारा अवलिया, ज्याला संघ सहकारी म्हणायचे ‘कबूतर’






