लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर रणजी ट्रॉफीचा ग्रुप क सामना खेळला जात आहे, ज्यात उत्तर प्रदेशच्या संघासमोर बंगालचं आव्हान आहे. या सामन्यात बंगालकडून खेळताना अभिमन्यू ईश्वरननं आणखी एक दमदार शतक झळकावलं.
प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, ईश्वरनचं हे सलग चौथं शतक आहे. त्यानं दुलीप ट्रॉफीमध्ये भारत ‘ब’ संघासाठी सलग दोन शतकं झळकावली होती. त्यानंतर त्यानं याच मैदानावर इराणी कप फायनलमध्ये रेस्ट ऑफ इंडियासाठी शतक झळकावलं. आता त्यानं रणजी ट्रॉफीमध्येही शतक झळकावून कमाल केली आहे.
ईश्वरन आणि सुदीप चॅटर्जी यांनी मिळून बंगालला सामन्यात मजबूत स्थितीत आणलं आहे. उत्तर प्रदेशचा संघ 292 धावांवर ऑलआऊट झाला. ईश्वरन आणि सुदीप यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 200 हून अधिक धावा केल्या. ईश्वरनचं हे शतक खास आहे, कारण या शतकासह त्यानं बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघातील आपला दावा मजबूत केला.
भारताला नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. तेथे उभय संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेच्या एक किंवा दोन कसोटी सामन्यांमधून आपलं नाव मागे घेऊ शकतो. अशा परिस्थितीत ईश्वरनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ईश्वरन सध्या 29 वर्षांचा असून त्यानं आतापर्यंत 98 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्याचं हे 27वं प्रथम श्रेणी शतक आहे.
अभिमन्यू ईश्वरननं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सुमारे 50 च्या सरासरीनं 7500 हून अधिक धावा केल्या आहेत. जर रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या एक-दोन सामन्यांमधून बाहेर पडला, तर ईश्वरन आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करताना दिसू शकतात.
हेही वाचा –
गौतम गंभीरचं वादाशी जुनं नातं, समाजसेवेतही दिलंय योगदान; जाणून घ्या भारताच्या हेड कोचचे माहित नसलेले किस्से
जम्मू-काश्मीरच्या खेळाडूचा धमाका! रणजी ट्रॉफीमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
टीम इंडियात पुन्हा होणार राहुल द्रविडची एन्ट्री? अचानक आले खेळाडूंना भेटायला; धक्कादायक व्हिडिओ समोर