बुद्धिबळ हा जगप्रसिद्ध खेळ असला तरी भारतात तो केवळ हौस म्हणून खेळला जातो. विश्वनाथन आनंद, कोनेरू हम्पी व तानिया सचदेव अशी काही मोजकीच नावे भारतातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेली दिसतात. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. मूळचा भारतीय असलेला मात्र अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या बारा वर्षीय अभिमन्यू मिश्रा याने बुद्धिबळ इतिहासातील सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला.
अभिमन्यू बनला सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर
अभिमन्यू मिश्रा याने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झालेल्या ग्रँडमास्टर स्पर्धेमध्ये ग्रँडमास्टर लिओन मेंडोका याला पराभूत केले. ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता म्हणजे १०० एलो गुण व तीन नॉर्मस अभिमन्यूने पूर्ण केले.
ही ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर, दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिमन्यू म्हणाला, “लिओन एक कडवा प्रतिस्पर्धी आहे. हा सामना अटीतटीचा होणार याची मला कल्पना होती. त्याने अखेरच्या क्षणी काही चुका केल्या आणि त्याचा फायदा मला झाला. सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर झाल्याचा मला अत्यंत आनंद होत आहे.”
आमचे स्वप्न पूर्ण झाले
अभिमन्यूचे वडील हेमंत यांनी अभिमन्यूच्या या दैदिप्यमान कामगिरीनंतर बोलताना म्हटले, “आमचा मुलगा सर्वात कमी वयात ग्रँडमास्टर व्हावा अशी माझी आणि माझी पत्नी स्वाती हिची इच्छा होती. त्यासाठी आम्ही एप्रिल महिन्यात न्यू जर्सीवरून बुडापेस्ट येथे येऊन राहत होतो. अभिमन्यूने आमचे स्वप्न पूर्ण केले याचा आम्हाला अभिमान वाटतो.” हेमंत हे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करतात.
अभिमन्यूने मोडला या खेळाडूचा विक्रम
अभिमन्यू याने सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर होण्याचा विक्रम करताना रशियाच्या सर्जी कर्जाकिन याला मागे सोडले. कर्जाकिन तब्बल १९ वर्षापासून या विक्रमावर कब्जा करून बसला होता. त्याने सन २००२ मध्ये हा विक्रम केला असताना त्याचे वय १२ वर्ष ७ महिने इतके होते. तर, अभिमन्यूचे वय आता १२ वर्ष ४ महिने २५ दिवस इतके आहे. त्यामुळे त्याने कर्जाकिनला तीन महिन्याच्या अंतराने मागे टाकत या विक्रमावर आपले नाव कोरले.
महत्त्वाच्या बातम्या –
“युनिस खानने माझ्या गळ्यावर चाकू ठेवला होता”, माजी पाकिस्तानी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा
“भारताविरुद्ध कसोटी मालिकेत आम्ही सर्वात मजबूत संघ मैदानात उतरवू”, इंग्लिश कर्णधाराने फुंकले रणशिंग
याला म्हणतात क्रिकेटवेड! रांचीतील या चाहत्याकडे आहेत क्रिकेटशी निगडीत तब्बल ५०० हून अधिक गोष्टी