भारतीय क्रीडा विश्वात ११ ऑगस्ट हा दिन सुवर्ण दिन म्हणून गणला जातो. कारण या दिवशी अभिनव बिंद्रा याने बीजिंग ऑलिंपिक २००८ मध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक मिळवले होते. या अगोदर भारताने हॉकीमध्ये ८ सुवर्ण पदके मिळवली होती परंतु ते सांघिक खेळ प्रकारात. १०० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला भारत वैयक्तिक खेळात एकही सुवर्ण जिंकू शकला नव्हता ही खूप मोठी शोकांतीका होती.
हॉकीच्या खेळाने मातीवरून गवतावर जशीच कुस बदलाली तसेच भारतीय हॉकी संघाचे सुवर्ण युग देखील संपले. १९२८-१९८० सालापर्यंत भारतीय संघाने हॉकीमध्ये पदके जिंकली. १९८० सालानंतर भारताला सांघिक खेळातही सुवर्ण पदक जिंकता आले नव्हते. बिंद्राने सुवर्ण पदक जिंकत इतिहासात आपले नाव कोरले.
१९ व्या वर्षी अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या या शूटरने २००८ सालच्या ऑलिंपिकला पात्र ठरला तेव्हा भारतातील काही हजार लोकंनाही तो ओळखीचा नसेन. जेव्हा तो १० मीटर एअर रायफल शूटींगच्या प्रकारात अंतिम फेरीत पोहचला तेव्हा संपूर्ण भारताला वेध लागले ते येणाऱ्या पदकाचे. कारण २००४ सालच्या अथेन्स ऑलिंपिकमध्ये हर्षवर्धनसिंग राठोड याने शूटींगमधील डबल ट्राप प्रकारात रौप्य पदक मिळवले होते.
शुटींग प्रकारात मोडणाऱ्या १० मीटर रायफल प्रकारच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली. अंतिम फेरीच्या सुवातीला फिनलँडचा हेनरी हक्कीनेन आणि चीनच्या झु कीनॊन यांनी चांगली सुरुवात केली. अंतिम फेरीतील पहिल्या काही फेऱ्यात ते दोघे गुणांमध्ये अभिनव बिंद्राच्या पुढे होते. मात्र बिंद्राने शांत आणि संयमी खेळ करत आपले लक्ष्य विचलित होऊ दिले नाही. शेवटच्या दोन फेरीतील त्याच्या अचूकतेने त्याला बाकी प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त गुण मिळवून दिले आणि त्याने या प्रकारातील ‘सुवर्ण पदक’ जिंकले.
वैयक्तिक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय होण्याचा मान अभिनव बिंद्रा याने मिळवला. या कामगिरिमळे त्याला भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार असणारा पदम भुषण मिळाला. कित्येक ठिकाणी त्याचे सन्मान कर्यक्रम झाले. संपूर्ण देशाचा तो हिरो ठरला.
पुढील ऑलिंपिक म्हणजे लंडन ऑलिंपिक २०१२ मध्ये त्याला चांगली करता आली नाही. अभिनव या ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीपर्यंतही पोहचू शकला नाही. परंतू २०१४ साली झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने सुवर्णपदक जिंकून आपण महान शूटर आहेत हे दाखवले. २०१६ सालच्या ऑलिंपिकमध्ये भारताचा ध्वजधारक होण्याचा मान त्याला मिळाला. यावेळी त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला पण त्याला कोणतेही पदक जिंकता आले नाही. येथे त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
याच दिवशी म्हणजे ११ ऑगस्ट रोजी केलेल्या सुवर्ण कामगिरीमुळे क्रिकेटर आणि ऍक्टर होण्याचे स्वप्न पाहणारे भारतातील लहान मुले ‘शूटर’ होण्याची स्वप्न पाहू लागली.