ऑस्ट्रेलियाचा महान यष्टिरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टनं जगातील तीन दिग्गज यष्टिरक्षकांची नावं सांगितली आहेत. त्यानं या तीन दिग्गज यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये भारताच्या महेंद्रसिंग धोनीचाही समावेश केला आहे. मात्र, गिलख्रिस्टनं धोनीला नंबर 2 वर ठेवलंय. त्यानं आपल्याच देशातील क्रिकेटपटूचं नाव पहिल्या क्रमांकावर घेतलं. धोनीचं नाव दुसऱ्या क्रमांकावर असून, श्रीलंकेचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ॲडम गिलख्रिस्टनं एमएस धोनीच्या आधी महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉडनी मार्श यांचं नाव घेतलं. मार्श हा माझा आदर्श असल्याचं गिलख्रिस्ट म्हणाला. 2003 आणि 2007 विश्वचषक विजेत्या गिलख्रिस्टनं धोनीच्या शांत स्वभावाचं कौतुक केलं आहे. याशिवाय त्यानं श्रीलंकेच्या कुमार संगकाराचंही नाव घेतलं.
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला, “रॉडनी मार्श हा माझा आदर्श होता. मलाही त्याच्यासारखं व्हायचं होतं. मला एमएस धोनीचा शांत स्वभाव आवडतो. तो आपल्या पद्धतीनं खेळला आणि नेहमी शांत राहिला. कुमार संगकारा, फलंदाजी असो किंवा विकेटकीपिंग, त्यानं जे काही केलं त्यात तो अतिशय दर्जेदार होता.”
गिलख्रिस्टनं निवडलेल्या तीन यष्टीरक्षकांच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर, रॉड मार्श यांनी ऑस्ट्रेलियासाठी 96 कसोटी सामन्यांमध्ये 343 झेल घेतले आणि 12 स्टंपिंग केलं आहे. तर एकदिवसीयमध्ये त्यांनी 92 सामने खेळताना 120 झेल घेतले आणि 4 स्टंपिंग केले. भारताचा दिग्गज यष्टीरक्षक धोनीनं 90 कसोटी सामन्यांमध्ये 256 झेल घेतले आणि 38 स्टंपिंग केले. तर एकदिवसीयमध्ये त्यानं 350 सामने खेळताना एकूण 321 झेल घेतले. धोनीच्या नावावर टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 57 झेल आणि 34 स्टंपिंग आहेत. कुमार संगकारानं 134 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यानं 182 झेल आणि 20 स्टंपिंग केले. वनडेमध्ये 404 सामने खेळताना त्यानं 402 झेल आणि 99 स्टंपिंग पूर्ण केले. या दिग्गज खेळाडूनं आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 25 झेल आणि 20 स्टंपिंग केले.
हेही वाचा –
टी20 पाठोपाठ आता कसोटीतूनही राहुलचा पत्ता कट होणार? सोपं गणित समजून घ्या
दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाली नाही, 400 हून अधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज आता विदेशात क्रिकेट खेळणार
स्टीव्ह स्मिथनं आव्हान स्वीकारलं! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला हरवून इतिहास रचणार; म्हणाला, “यंदा…”