भारतीय पुरूष फुटबॉल संघाने मंगळवारी (३१ मार्च) हॉंगकॉंगला २-१ असे पराभूत केले. त्याचबरोबर एएफसी अशियाई कप २०२७ च्या पात्रता फेरीच्या प्रवासाचा शेवट विजयी केला आहे. भारताचा हा पहिलाच विजय ठरला आहे. त्यामुळे ते पहिल्यांदाच खंडीय स्पर्धेसाठी अपात्र ठरले. ही स्पर्धा आता २४ संघांची झाली आहे. असे असले तरी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना भारतासाठी महत्वाचा ठरला आहे. या सामन्यात भारताकडून रायन विल्यम्स आणि आकाश मिश्रा यांनी प्रभावी कामगिरी केली.
विल्यम्स एक माजी ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटू आहे. तो पोर्ट्समाउथ आणि फुलहॅमसारख्या क्लब्सकडून सामने खेळला आहे. भारतात येण्याआधी त्याला इंग्लंडमधील चॅम्पियनशीप आणि त्याखालच्या लीगचाही अनुभव आहे. सध्या तो आयएसएलमध्ये बंगळुरू एफसीकडून खेळतो. विल्यम्सची आई मुंबईची असून त्याने केलेले पदार्पण संघासाठी महत्वपूर्ण ठरले आहे. त्याला ऑस्ट्रेलिया फुटबॉलकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याने या सामन्यावेळी सर्वांच्या नजरा त्याच्यावरच होत्या. तो भारताचा नवा जर्सी क्रमांक १० आहे.
या सामन्यात विल्यम्सने चौथ्याच मिनिटाला गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हा गोल भारतासाठी पदार्पण करताना केलेला सर्वात वेगवान गोल ठरला आहे. यापूर्वीचा विक्रम १९६३ मध्ये कोलंबोच्या ऑलिम्पिकपूर्व सामन्यात सिलोन (आताचे श्रीलंका) विरुद्ध के अप्पलराजू यांनी केला होता. त्यांनी हा गोल सहाव्या मिनिटाला केला होता.तसेच मेहताब होसेन याने साफ कपमध्ये नेपाळविरुद्ध सहाव्या मिनिटाला गोल केला होता.
आघाडी मिळाल्यानंतर यजमान संघाने चेंडूवर नियंत्रण ठेवत त्यांचे वर्चस्व कायम राखले. ५० व्या मिनिटाला आकाशने गोल करत आघाडी वाढवली. ६५ व्या मिनिटाला एव्हर्टन कॅमार्गो याने हॉंगकॉंगकडून गोल करत सामना २-१ असा केला. नंतर भारताने संयमी खेळ करत विजय निश्चित केला. भारताचा हा कोचीमधील पहिला विजय ठरला आहे. याआधी संघाने येथे १७ सामने खेळले होते. त्यातील सहा सामने अनिर्णीत राहिले, तर ११ सामने गमावले होते.






