संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या आशिया चषक 2022 मधील तिसरा सामना अफगाणिस्तान व बांगलादेश यांच्या दरम्यान खेळला गेला. आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलेल्या अफगाणिस्तानचे लक्ष हा सामना जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश करण्याचे होते. जबरदस्त सांघिक कामगिरी करत त्यांनी हे लक्ष साध्य केले. राशिद खान व मुजीब उर रहमान यांनी गोलंदाजीत तर इब्राहिम आणि नजीब झादरान यांनी फलंदाजीत शानदार कामगिरी करत आपल्या संघाला विजयी रेषेपार नेले.
शारजा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्वतः शाकिबसाठी हा 100 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता. मात्र, त्याने घेतलेला फलंदाजीचा निर्णय मुजीब उर रहमानने पूर्णतः चुकीचा ठरवला. त्याने शाकिबसह दोन्ही सलामीवीरांना 5.2 षटकात 24 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर राशिद खानने रहीमला बाद करत बांगलादेशची अवस्था आणखीनच खराब केली. अनुभवी महमदुल्ला व अफीफ हुसेन यांनी थोडाफार डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते जास्त काळ टिकू शकले नाहीत. मोसद्देक हुसेन याने अखेरपर्यंत नाबाद राहत 31 चेंडूत 48 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी मुजीब व राशीद यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
बांगलादेशने दिलेल्या 128 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. मागील सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केलेला गुरबाज लवकर बाद झाला. झझाई व इब्राहिम झादरान यांनी संयम दाखवत संघाची जास्त पडझड होऊ दिले नाही. झझाई बाद झाल्यानंतर कर्णधारण नबीदेखील केवळ आठ धावा करू शकला. मात्र, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नजीब झादरानने तुफान फटकेबाजी करत बांगलादेशला सामन्यातून बाहेर केले. त्याने केवळ 17 चेंडूवर 6 षटकार आणि 1 चौकार ठोकत नाबाद 43 धावा करून संघाला सात गडी राखून विजय मिळवून दिला. सामनावीर पुरस्कार मुजीबला देण्यात आला. या विजयासह अफगाणिस्तान ब गटातून अव्वल राहत सुपर फोरमध्ये खेळताना दिसेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अल्टिमेट खो-खो: मुंबई खिलाडीज संघाचा विजयाने समारोप
भारतीय गोलंदाजाने अखेर सोडली संघाची साथ; म्हटला, ‘मागच्या १८ वर्षात…’
सलग दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला विजयाची गॅरंटी! हॉंगकॉंगही धक्का देण्यास तयार