आगामी टी20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. येत्या 2 जूनपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होईल. तत्पूर्वी, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं मोठी घोषणा केली आहे. अफगाणिस्ताननं वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला संघाचा गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केलं.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं (ACB) मंगळवारी (21 मे) एक निवेदन जारी केलं. निवेदनात म्हटलंय की, “बोर्डानं ड्वेन ब्राव्होला अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाजी सल्लागार म्हणून समाविष्ट केलं आहे. अफगाणिस्तानचा संघ सरावासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. ब्राव्हो लवकरच संघाचा भाग बनेल.”
40 वर्षीय ड्वेन ब्राव्होनं खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजसाठी दोन विश्वचषक जिंकले आहेत. तो सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. त्यानं 295 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 6423 धावा बनवल्या आहेत. या दरम्यान त्यानं 363 बळी सुद्धा घेतले आहेत. ब्राव्हो 100 प्रथम श्रेणी, 227 लिस्ट ए आणि 573 टी20 सामने खेळला आहे.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा रेकाॅर्ड ब्राव्होच्या नावावर आहे. त्यानं टी20 मध्ये आतापर्यत 625 बळी घेतले आहेत. तर त्यानं सुमारे 7000 धावा देखील केल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ब्राव्होनं वेस्ट इंडिजकडून खेळताना 91 सामन्यांमध्ये 78 विकेट्स घेतल्या आहेत.
ड्वेन ब्राव्होनं 2008 साली मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केलं होतं. त्यानं आयपीएलमध्ये 161 सामने खेळले आहेत. त्यामध्ये फलंदाजी करताना त्यानं 129.57च्या स्ट्राईक रेटनं 1560 धावा बनवल्या. तर गोलंदाजीत त्यानं 8.39 इकाॅनाॅमी रेटनं 183 विकेट्स घेतल्या आहेत. ब्राव्होकडे गोलंदाजीचा तसेचं फलंदाजीचा देखील भरपूर अनुभव आहे. त्यामुळे अफगाणिस्तान संघाला टी20 विश्वचषकात त्याच्या अनुभवाचा खूप फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळल्या गेलेल्या 3 तुफानी खेळी, ज्या चाहत्यांच्या आजही स्मरणात आहेत
टी20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का! जोस बटलर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर