अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात सध्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेदरम्यान अफगाणिस्तानच्या एका स्टार खेळाडूनं अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला.
अफगाणिस्तानचा दिग्गज फलंदाज नूर अली जद्राननं गुरुवारी, 7 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यापूर्वी अफगाण खेळाडूंनी नूरला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन त्याचा सन्मान केला.
नूर अलीनं अफगाणिस्तानसाठी 2 कसोटी, 51 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. त्यानं 2009 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. विशेष म्हणजे नूर अलीनं गेल्या महिन्यातच आयर्लंडविरुद्ध करिअरचा पहिला कसोटी सामना खेळला होता. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, नूर अली जद्रानचा पुतण्या इब्राहिम जद्रान देखील अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. सामना सुरू होण्यापूर्वी इब्राहिम झद्राननं त्याच्या काकाला कसोटी पदार्पणाची कॅप सोपवली होती.
नूर अली जद्राननं अफगाणिस्तानसाठी 51 एकदिवसीय सामन्यात 24.81 च्या सरासरीनं 1216 धावा आणि 23 टी 20 मध्ये 27.13 च्या सरासरीनं 597 धावा केल्या आहेत. त्यानं यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध एक आणि महिन्याच्या अखेरीस अबू धाबी येथे आयर्लंडविरुद्ध एक असे दोन कसोटी सामने खेळले. या दोन कसोटी सामन्यांच्या चार डावात त्यानं 117 धावा केल्या.
नूर अली जद्राननं शेवटचा एकदिवसीय सामना 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. यानंतर, त्याला ऑक्टोबर 2023 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत टी 20 साठी अफगाणिस्तान संघात परत बोलावण्यात आलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध अनुक्रमे 51 आणि 39 धावा केल्या होत्या.
नूर अलीनं एप्रिल 2009 मध्ये अफगाणिस्तानकडून स्कॉटलंडविरुद्ध वनडे पदार्पण केलं. नूरनं पहिल्या वनडे सामन्यातच 28 चेंडूत 45 धावांची शानदार खेळी केली होती. त्यानं फेब्रुवारी 2010 मध्ये पहिला टी 20 सामना खेळला. 2010 च्या टी-20 विश्वचषकात नूरनं भारताविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. तसेच तो 2016 मध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकातही अफगाणिस्तान संघाचा सदस्य होता.
महत्त्वाच्या बातम्या-
डॉन ब्रॅडमननंतर यशस्वीचाच नंबर! क्रिकेटच्या ‘या’ खास लिस्टमध्ये मिळवलं स्थान
वडिलांनी आत्महत्या केली, आईला कॅन्सर झाला; ‘बेझबॉल’चा पोस्टर बॉय बेअरस्टोचा 100 कसोटीपर्यंतचा प्रवास