अफगाणिस्तानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बिस्मिल्लाह जन शिनवारी यांचे एका आत्मघातकी हल्ल्यातमध्ये निधन झाले आहे. शनिवारी(३ ऑक्टोबर) अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतातील एका रस्त्याच्या कडेला बाँबब्लास्ट झाला होता. या बाँबब्लास्टमध्ये ३६ वर्षीय शिनवारी यांना आपला जीव गमवावा लागला.
शिनवारी यांनी १२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. यात ६ वनडे आणि ६ टी२० सामन्यांचा समावेश आहे. त्यांनी सर्वात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पंच म्हणून ७ डिसेंबर २०१७ ला अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड संघात झालेल्या वनडे सामन्यात काम केले होते. तर त्यांनी पंच म्हणून शेवटचे १० मार्च २०२० ला अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड संघात झालेल्या टी२० सामन्यात काम केले.
अफगाणिस्तानमधील माध्यमांतील वृत्तानुसार नांगरहार येथे कारमध्ये आत्मघातकी बाँम्बब्लास्ट झाला. हा ब्लास्ट नांगरहारचा पूर्व विभागात गनीखिल जिल्ह्यातील राज्यपालांच्या कंपाऊंडजवळ दुपारी झाला. राज्यपालांच्या प्रवक्त्यांनी या दुर्घटनेची पुष्टी केली आहे. तसेच काही बंदूकधार्यांनी राज्यपालाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी उघड केले आहे. पण त्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार मारले. स्फोट झाल्यानंतर राज्यपालांच्या आवारात प्रवेश करण्याचा त्यांचा हेतू होता.
या ब्लास्टमध्ये शिनवारींसह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचे देखील मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेत एकूण १५ लोक मृत्यूमूखी पडले आहेत. तर ३० लोक जखमी झाले आहेत.