सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा कसोटी सामना आहे. या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने पहिल्या डावात नाबाद 159 धावांची खेळी केली आहे.
याबरोबरच त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. तो ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे. त्याचबरोबर त्याने आणखीही एक खास विक्रम केला आहे. तो कसोटी पदार्पणानंतर पहिल्या 15 डावात सर्वाधिक धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक आहे.
त्याने ऑगस्ट 2018मध्ये नॉटिंगघम कसोटीमध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आत्तापर्यंत 9 सामन्यातील 15 डावात फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 49.71 च्या सरासरीने 696 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो कसोटी पदार्पणानंतर पहिल्या 15 डावात सर्वाधिक धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.
याआधी हा विक्रम एमएस धोनीच्या नावावर होता. धोनीने त्याच्या कसोटी पदार्पणानंतर पहिल्या 15 डावात 522 धावा केल्या होत्या.
पंतने सिडनी कसोटीत केलेले हे शतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक आहे. याआधी त्याने इंग्लंड विरुद्ध पहिले शतक केले होते. तसेच त्याने 2 अर्धशतकेही केली आहेत.
या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला आहे. भारताकडून चेतेश्वर पुजारा 193 आणि रिषभ पंतने नाबाद 159 धावांची शतकी, तर रविंद्र जडेजा 81 आणि मयंक अगरवालने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.
तसेच या डावात पुजारा-अगरवालने दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची, पुजारा- हनुमा विहारीने पाचव्या विकेटसाठी 101 धावांची तर जडेजा-पंतने सातव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली आहे.
कसोटी पदार्पणानंतर पहिल्या 15 डावात सर्वाधिक धावा करणारे भारतीय यष्टीरक्षक –
696 धावा – रिषभ पंत
522 धावा – एमएस धोनी
417 धावा – नयन मुंगिया
390 धावा – फारुख इंजिनियर
महत्त्वाच्या बातम्या:
–म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सिडनी कसोटीदरम्यान पिंक कॅप दिल्या ग्लेन मॅकग्राला
–केएल राहुलचे मैदानातील ते कृत्य पाहून अंपायरलाही करावे लागले कौतुक, पहा व्हिडिओ
–Video: जेव्हा ऑस्ट्रेलियन कर्णधार पत्रकार परिषदेत बोलतो पत्रकाराच्याच फोनवर…