जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात जपानच्या नोजोमी ओकुहारा हिने साईना नेहवालचा १२-२१, २१-१७,२१-१०असा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. पहिला सेट जिंकल्यानंतरही साईना हा सामना जिंकू शकली नाही.
पहिल्या सेटच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडू २-२ अश्या बरोबरीत होते. त्यानंतर साईनाने नेटजवळ उत्तम खेळ करत सामन्यात ७-२ अशी आघाडी मिळवली. सेटमध्ये जेव्हा ब्रेक देण्यात आला तेव्हा साईना ११-६ अशी आघाडीवर होती. साईनाने उत्तम खेळ करत विरोधी खेळाडूवर १८-१० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर साईनाने हा सेट २१-१२ असा जिंकला. हा सेट जिंकण्यासाठी साईनाने २२ मिनिटे घेतली.
दुसऱ्या सेटच्या सुरुवातीपासून जपानी ओकुहाराने आक्रमक खेळ केला. तिने या सेटमध्ये ४-१ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर विरोधी खेळाडूची आघाडी कमी करण्यात सायनाला यश आले पण जेव्हा ब्रेक झाला तेव्हा साईना ११-१० अशी एका गुणाने पिछाडीवर होती. साईनाने १५-१५ असा गुणफलक बरोबरीत आणला. पण शेवटी जपानी खेळाडुने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत हा सेट २१-१७ असा आपल्या नावे केला.
तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीपासूनच गुणांसाठी चुरस पाहायला मिळाली. साईनाने ३-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ओकुहारने सलग ६ गुण मिळवत या सेटमध्ये ७-३ अशी आघाडी मिळवली. जेव्हा ब्रेक देण्यात आला त्यावेळी साईना ११-४ अशी पिछाडीवर पडली. जपानी खेळाडूने पूर्ण खेळावर वर्चस्व मिळवत यासेटमध्ये १५-७ अशी आघाडी घेतली. त्यानंतर हा सेट २१-१० असा जिंकला. या विजयासह नोजोमी ओकुहारा हिने अंतिम सामन्यात प्रवेश मळावाला.
साईना नेहवाल हिला या सामन्यातील पराभवामुळे कांस्य पदकावर समाधान मानावे लागणार आहे.