---Advertisement---

अखेर 78 सामन्यांनंतर रवि बिश्नोईचे स्वप्न झाले पूर्ण! आयपीएलमध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम

On: रविवार, एप्रिल 5, 2026 10:53 AM
---Advertisement---

राजस्थान रॉयल्सचा स्टार फिरकीपटू रवी बिश्नोईने शनिवारी (४ एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्धच्या विजयात महत्वाची कामगिरी केली. २१० धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यासाठी रवीने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ४१ धावा देत ४ विकेट्स घेतले. त्याने गुजराजताच स्टार सलामीवीर साई सुदर्शनला ७३ धावांवर, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवातिया यांना बाद केले. त्याच्या या अप्रतिम गोलंदाजीने राजस्थानने अवघ्या ६ धावांनी विजय मिळवला. रवी सामनावीर ठरला.

रवीचा हा आयपीएलमधील पहिलाच सामनावीर पुरस्कार आहे. त्याला हा पुरस्कार मिळाल्यानंतर हायसे वाटले असेल. तो मागील अनेक हंगामापासून खेळत आहे, मात्र कधीही सामनावीर ठरला नव्हता. अखेरीस त्याने आपल्या ७९ व्या आयपीएल सामन्यात हा पुरस्कार जिंकला.

आयपीएलच्या इतिहासात असे तीन खेळाडू आहेत, ज्यांनी रवीपेक्षा अधिक सामने खेळले असून एकदाही ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकला नाही.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने (सामनावीर पुरस्कार न जिंकता)
९५ – स्टुअर्ट बिन्नी
९३ – सौरभ तिवारी
९२ – धवल कुलकर्णी

गुजरातविरुद्धच्या दमदार कामगिरीमुळे रवी आयपीएल २०२६ च्या पर्पल कॅपचा हकदार ठरला आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत ५ विकेट्स घेतल्या आहेत. पहिला सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर रवी म्हणाला, “मागील हंगाम कठिण होता, मात्र मी माझ्या पद्धतीवर ठाम राहण्याचे ठरवले. लेंथ चुकली तर मला षटकार पडणार, हे माहित होते. त्यासाठी मी प्रचंड मेहनत केली. पूर्ण हंगाम खेळलो आणि भारताकडूनही काही सामने खेळले. त्यामध्ये मी माझ्या लेंथवर काम केले आणि सातत्याने चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकण्याची योजना होती. या सामन्यात मला काही शॉट्स मारले गेले, मात्र ते टप्प्याबाहेरच्या चेंडूवर मारले गेले.”

त्याचबरोबर रवीने त्याचे टी२० मधील २०० विकेट्सचा टप्पाही पार केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात पराभूत झाला असून त्यांचा हा या हंगामातील सलग दुसरा पराभव आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---