फिफा विश्वचषक २०१४ चा विजेता संघ जर्मनीने २०२६ आवृत्तीची सुरूवातही दमदार केली आहे. त्यांनी पहिल्याच साखळी सामन्यात कुरासाओचा ७-१ असा पराभव केला. जर्मनीच्या या प्रभावी विजयाचा मोठा परिणाम ब्राझीलवर झाला. २०२६ च्या फिफा विश्वचषकात जर्मनी आणि ब्राझील वेगवेगळ्या गटात आहेत, मग जर्मनीच्या विजयाचा ब्राझीलवर कसा काय परिणाम झाला, ते जाणून घेऊ.
झाले असे की, जर्मनीने हा विजय मिळवताच फिफाच्या खास यादीत ब्राझीलला मागे टाकत अव्वल स्थान काबीज केले आहे. जर्मनीने या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा संघ म्हणून ब्राझीलची जागा घेतली आहे.
फिफा विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधी, ब्राझील २३७ गोलसह आघाडीवर होता. जर्मनी २३२ गोलसह दुसऱ्या स्थानावर होता, मात्र दोन्ही संघाचे या विश्वचषकात प्रत्येकी एक-एक सामने झाले असता पूर्णपणे आकडेवारी बदलली.
या स्पर्धेत ब्राझीलचा पहिला सामना मोरोक्कोविरुद्ध होता, ज्यामध्ये त्यांनी केवळ एकच गोल केला. हा सामना १-१ असा बरोबरीत राहिला. दुसरीकडे जर्मनीने रविवारी (१४ जून) ह्युस्टन येथे कुरासाओविरुद्ध पहिल्या मिनिटापासूनच आक्रमक सुरूवात केली आणि सामना ७-१ असा जिंकला. यामुळे जर्मनीचे विश्वचषकात २३९ गोल झाले आहेत. त्यांनी ब्राझीलला एक गोलने मागे टाकले आहे.
फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल
जर्मनी – २३९
ब्राझील – २३८
अर्जेंटिना – १५२
फ्रान्स – १३६
इटली – १२८
मागील विश्वचषकात म्हणजे २०२२ च्या आवृत्तीत जर्मनीची कामगिरी निराशाजनक झाली होती. ते गट फेरीच्या पुढे जाण्यात अपयशी ठरले होते. सध्या ते स्पर्धेतील सर्वात तरुण प्रशिक्षक असलेल्या ज्युलियन नागेल्समन यांच्या मार्गदर्शनाखाली एक धोकादायक संघ दिसत आहे. ७-१ च्या विजयासह, जर्मनी चार सामन्यांमध्ये सात किंवा त्यापेक्षा अधिक गोल करणारा एकमेव देश ठरला आहे. यापूर्वी त्यांनी अशी कामगिरी २०१४ मध्ये ब्राझीलविरुद्ध केली होती.






