जेव्हापासून आयपीएलला सुरुवात झाली तेव्हापासून मेन टूर्नामेंटपेक्षा ज्या गोष्टीची सर्वाधिक चर्चा होत असते, ती गोष्ट म्हणजे आयपीएल ऑक्शन. टुर्नामेंट सुरू व्हायच्या जवळपास दोन महिने आधी पार पडणारा खेळाडूचा हा बाजार चांगलाच सजतो. आकाश चोप्रा म्हणतो तसं, खरी आयपीएल ग्राउंडमध्ये नाही तर त्याच्याआधी ऑक्शन टेबलवर होत असते. सर्व फ्रॅंचायजी इथेच आपल्या टीम्स बांधतात आणि त्या खेळाडूंच्या जीवावर आयपीएल चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पाहिल जात. आयपीएलच्या त्या सुंदर ट्रॉफीसाठी फ्रॅंचाईजी खेळाडूंवर पैशाचा पाऊस पाडतात. वीस लाखापासून पुढे करोडोंपर्यंत क्रिकेटर हे पैसे कमावतात. अगदी कोणाला माहित नसलेले क्रिकेटरही कधीकधी ८-१० कोटींवर पोहोचतात.
मात्र, हे पैसे त्यांना जसेच्यातशे मिळतात का? की त्यावर काही टॅक्स लागतो? क्रिकेट बोर्डाला काही द्यायचं असतं का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या खास लेखातून जाऊन घेऊ. दरम्यान आपण वेळोवेळी वेगवेगळ्या खेळाडूंची उदाहरणे देत, एकेक प्रकरण समजून घेऊ…
सर्वात आधीतर हे जाणून घेऊ की खेळाडूंना पैसे मिळतात कसे? तर प्रत्येक खेळाडूला संबंधित फ्रॅंचाईजी तीन टप्प्यात पैसे देत असते. ते कसे हे खालच्या उदाहरणावरून जाणून घेऊया.
आयपीएल २०२२ चे ऑक्शन पार पडले तेव्हा सर्वात महागडा खेळाडू ठरला ईशान किशन. त्याच्यावर मुंबई इंडियन्सने तब्बल १५ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावली. ईशानला या रकमेपैकी २०% रक्कम, नियमाप्रमाणे आयपीएल सुरू झाल्यावर पहिल्या दहा दिवसातच मिळाली, म्हणजे ५ एप्रिलपर्यंत ईशानच्या खात्यात साडेतीन कोटी रुपये जमा झाले होते. दुसऱ्या नियमानुसार सिझन सुरू असताना ६० टक्के रक्कम खेळाडूला मिळणे बंधनकारक असते. त्यानुसार मे महिन्यात ईशानला ८ कोटी २५ लाख रुपये मिळायला हवे. बोलीतील रकमेचा अखेरचा हप्ता सीजन संपल्यानंतर, खेळाडूला मिळतो. म्हणजे राहिलेले साडेतीन कोटी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याला मिळतील.
ईशानवर १५ कोटी २५ लाख रुपयांची ही बोली एका वर्षासाठी लागली आहे. म्हणजेच एका सिझनमध्ये खेळण्यासाठी त्याला हे पैसे मिळतील. दुखापत नसताना तो एकही मॅच न खेळता, फक्त डग आऊटमध्ये बसून राहिला असता तरी, नियमानुसार मुंबई इंडियन्सला त्याला हे पैसे द्यावे लागले असते. पुढच्या वर्षी त्याला खेळवायचे असल्यास त्याला हीच रक्कम मिळेल. मुंबईने त्याला रिलीज केल्यानंतरच तो ऑक्शनमध्ये येईल आणि त्याचा नव्याने लिलाव होईल.
आता वळूया जखम झालेल्या खेळाडूंकडे. खरंतर हाच प्रश्न सर्वात पहिल्यांदा चाहत्यांकडून विचारला जातो की, खेळाडू दुखापतग्रस्त होऊन बाहेर गेला तर त्याला किती पैसे मिळतात?. पैसे मिळतात की नाही?. तरी यासाठी आपण उदाहरण घेऊया दीपक चहरचे.
दीपक चहरवर चेन्नई सुपर किंग्जने यावर्षी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटींची भलीमोठी बोली लावली. मात्र, तो सीझन सुरू व्हायच्या आधीच लिगमधून बाहेर पडला. त्याने या दुखापतीची कल्पना फ्रॅंचाईजीला दिली असल्यास, त्याला कॉन्ट्रॅक्टच्या निम्मी रक्कम मिळणे बंधनकारक आहे. म्हणजेच दीपक चहरला एकही मॅच न खेळता, चेन्नईच्या डग आउटमध्ये न येताही ७ कोटी रुपये मिळाले असणार. दुसरीकडे सीजनची कमीत कमी एक मॅच खेळून, दुखापतग्रस्त झाल्यावर टूर्नामेंट बाहेर गेलेल्या प्लेअरला, पूर्ण रक्कम दिली जाते. म्हणजेच पहिल्याच मॅचला इंजर्ड होऊन टूर्नामेंट बाहेर गेलेल्या राजस्थान रॉयल्सच्या नॅथन कुल्टर-नाईलला, ऑक्शनमध्ये बोली लागलेली २ कोटींची पूर्ण किंमत मिळेल.
आता दुसरा मुद्दा येतो खेळाडूंना द्याव्या लागणाऱ्या टॅक्सचा. प्रत्येक भारतीय खेळाडूला लिलावातून मिळणाऱ्या रकमेच्या १० टक्के टीडीएस भरावा लागतो. टॅक्सचा हाच टक्का विदेशी क्रिकेटर्ससाठी २० टक्के होतो., म्हणजे रोहित शर्माला १५ कोटींपैकी दीड कोटी तर; फाफ डू प्लेसिसला आपल्या ७ कोटींपैकी १ कोटी ४० लाख टॅक्सच्या रूपात द्यावे लागतील.
येथे विदेशी खेळाडूंना आणखी एक तोटा आहे. तो तोटा असा की, त्यांना मिळणाऱ्या रकमेच्या २० टक्के रक्कम त्यांना आपल्या क्रिकेट बोर्डांना द्यावी लागते. उदाहरणार्थ, या वर्षी इंग्लंडच्या जोस बटलरला राजस्थान रॉयल्सने १० कोटींमध्ये रिटेन केले. आता या १० कोटींपैकी २ कोटी त्याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला द्यावे लागतील.
यावर्षीच्या आयपीएल ऑक्शनमध्ये नियमांचा एक चांगला फायदा मुंबई इंडियन्सने उचलला. इंग्लंडचा हुकमी एक्का जोफ्रा आर्चर या सीझनला खेळणार नाही हे त्याने सांगितले होते. त्याचे नाव आयपीएल ऑक्शनच्या प्रायमरी लिस्टमध्ये नव्हते. मात्र अखेरच्या क्षणी मुंबईने त्याचा समावेश करण्याची विनंती केली. अखेर लिलावात त्याला ८ कोटींमध्ये त्यांनीच खरेदी केले. याचा फायदा असा की, ते आठ कोटी त्यांच्या पर्समधून कट झाले मात्र त्यातील एक रुपयाही आर्चरला दिला गेला नाही. जास्तीचा फायदा हा की, पुढील सीजनमध्ये आर्चर त्यांच्याच टीमसाठी खेळेल, हे त्यांनी नक्की केले.
महत्त्वाच्या बातम्या-
तोडीस तोड! दक्षिण आफ्रिकेचे ‘हे’ ४ गोलंदाज भारताच्या फलंदाजांवर पडू शकतात भारी, एकाने गाजवलीय आयपीएल
आयपीएल ट्रॉफी बनवायला चक्क ‘इतके’ कोटी आला होता खर्च, ३० कारागिरांनी मिळून बनवलाय चषक
आधी फास्ट बॉलर, मग स्पिनर आणि आता बॅटर म्हणून नाव कमावलेला आरसीबीचा रजत पाटीदार