काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडचे अष्टपैलू खेळाडू क्रिस केर्न्स यांची हृदयाची मुख्य धमनी फुटली होती. ज्यामुळे त्यांच्यावर ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील रुग्णालयात उपचार चालू होते. ज्यानंतर त्यांना तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने सिडनी येथे हलवण्यात आले होते. मात्र, त्यांच्या बाबतीत आता आणखी एक बातमी समोर आली आहे.
हृदयाची मुख्य धमणी फुटल्यानंतर क्रिस केर्न्स यांच्यावर सिडनी येथे शस्त्रक्रिया चालू होती. यादरम्यान त्यांना ‘स्पायनल स्ट्रोक’मुळे पायांना लकवा मारला आहे. याबाबत केर्न्स यांचे वकील एरोन लॉईड यांनी शुक्रवारी एका वेबसाईटला याबाबत माहिती दिली. यात ते म्हणाले, “केर्न्स यांची मुख्य धमणी फुटल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया चालू होती. यादरम्यान त्यांना ‘स्पायनल स्ट्रोक’ आला होता. ज्यामुळे ते पायांकडील भागातून लकवाग्रस्त झाले”
“यानंतर ते ऑस्ट्रेलियामध्ये मणक्याच्या संबंधित रुग्णालयात तपासणी करून घेणार आहे.” असेही लॉईड म्हणाले. केर्न्स गेल्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित अडचणींना सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांना कॅनबेराच्या एका रुग्णालयात ‘लाईफ सपोर्ट’वर देखील ठेवण्यात आले होते. यानंतर क्रिकेट जगतातून अनेक दिग्गजांकडून केर्न्स यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात होती. सध्या केर्न्स यांची प्रकृती गंभीर आहे.
न्यूझीलंडचा माजी विस्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमने देखील केर्न्ससाठी मदतीचा हात पुढे केला होता. विशेष म्हणजे केर्न्स यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले होते. ज्यामध्ये मॅक्युलमने केर्न्स यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. मात्र, मॅक्युलमने त्या गोष्टी बाजूला ठेवत त्यांच्या परिवाराला व केर्न्स यांना मदतीचा हात पुढे केला.
दरम्यान, क्रिस केर्न्स हे न्यूझीलंडचे त्यांच्या काळातील दिग्गज अष्टपैलू खेळाडूपैकी एक होते. केर्न्सने न्युझीलंडकडून खेळताना ६२ कसोटी सामने खेळले आहेत. तर २१५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच सोबत २ टी-२० सामन्यांमध्ये देखील न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे.
केर्न्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८२७३ धावा केल्या आहेत. त्याच सोबत त्यांनी ४२० विकेट्स देखील घेतल्या आहेत. तसेच केर्न्स यांनी कसोटीमध्ये ५ आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ शतके देखील ठोकलेल्या आहेत. केर्न्स यांनी कसोटीमध्ये १३ वेळा ५ विकेट्स घेण्याचा कारनामा देखील केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–जेव्हा विवियन रिचर्ड्स लिटिल मास्टरला म्हणाला होता, “यू आर मेड ऑफ स्टील मॅन”
–क्रिकेटविश्वातील ‘फॅब फोर’ने केव्हा ठोकली होती अखेरची शतके, वाचा सविस्तर
–‘मैदानावर आक्रमक असल्याने गांगुलीला मदत मिळायची, विराटचेही असेच काही आहे’, दिग्गजाचे मत