देशांतर्गत क्रिकेटमधील बडोदा संघात मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे. आगामी विजय हजारे ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी बडोदा संघाला एक नवीन कर्णधार मिळाला. तत्पूर्वी, बडोदा संघाचा आधीचा कर्णधार कृणाल पंड्याने अचानक संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर संघाला हा नवीन कर्णधार निवडावा लागला. बडोदा क्रिकेट संघाने रविवारी (२८ नोव्हेंबर) त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली. संघाच्या नवीन कर्णधाराच्या रुपात केदार देवधरला निवडले गेले आहे. तसेच संघाच्या उपकर्णधारपदी भार्गव भट याची नियुक्ती केली गेली.
केदार देवधर उजव्या हाताने फलंदाजी करणारा उत्कृष्ट खेळाडू आहे. केदारने आतापर्यंत एकूण ७३ लिस्ट ए सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये २४०२ धावा केल्या आहेत. केदारची कर्णधारपदी नियुक्ती करण्याच्या एक दिवसापूर्वी संघाचे नेतृत्व करणाऱ्या कृणालने कर्णधार पदाचा राजीनामा दिलेला. तत्पूर्वी, कृणाल मागच्या दोन वर्षापासून बडोदा संघाचे नेतृत्व करत होता. नुकत्याचा पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याला संघाचे नेतृत्व करताना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. बडोदा संघाने मुश्ताक अली ट्रॉफीत खूपच खराब प्रदर्शन केले होते. आता याच पार्श्वभूमीवर कृणालने संघाचे नेतृत्व सोडले असल्याचे सांगितेल जात आहे.
आगामी विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोदा संघ चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असेल. संघाची आगामी स्पर्धेत चांगली कामगिरी करून घेण्याची जबाबदारी केदार देवधरने स्वीकारली आहे. विजय हजारे ट्रॉफी डिसेंबर महिन्यात ८ तारखेपासून सुरू होईल. विजय हजारे ट्रॉफीदरम्यान बडोदा संघ एलीट ग्रुप बी मध्ये सामील आहे. या ग्रुपमध्ये बडोदा संघासोबत तमिलनाडु, मुंबई, बंगाल, कर्नाटक आणि पॉंडेचेरी या संघांचा समावेश आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू असलेला कृणाल मागच्या बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला यापूर्वी भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यावर निवडले गेले होते. त्यानंतर टी२० विश्वचषकासाठी त्याच्या नावाचा विचार केला गेला नाही. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतही तो संघाचा भाग नव्हता. आयपीएलच्या पुढील हंगामासाठी मुंबई इंडियन्स त्याला कायम करण्याची शक्यता अगदीच कमी आहे.