सनरायझर्स हैदराबाद संघाला आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम येथे दारुण पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या सामन्यात हैदराबादला 8 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. आयपीएल 2023च्या 65व्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर हैदराबादचा कर्णधार एडेन मार्करम याने मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, चांगली फलंदाजी करूनही संधीचा पूर्ण फायदा घेता आला नाही.
काय म्हणाला मार्करम?
सामन्यानंतर एडेन मार्करम (Aiden Markram) म्हणाला की, “मला वाटते, आम्ही खूप चांगली फलंदाजी केली. मात्र, संधीचा पूर्ण फायदा उचलू शकलो नाही. कदाचित पॉवरप्लेमध्ये काहीतरी कमी पडलं.” क्लासेनसाठी सामना न जिंकू शकल्याने मार्करम नाराज झाला. पुढे बोलताना तो म्हणाला की, “हेन्रीचसाठी सामना जिंकू शकलो नाही, ज्याने आज शानदार फलंदाजी केली.”
याव्यतिरिक्त विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) यांच्या भागीदारीने सामना त्यांच्याकडून दूर नेला. यावर बोलताना मार्करम म्हणाला की, “फाफ आणि कोहलीने सामन्यातील आमच्या आशा संपवून टाकल्या.”
हंगामातील घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यासाठी स्टेडिअममध्ये पोहोचलेल्या चाहत्यांचे मार्करमने कौतुक केले. तो म्हणाला की, “फक्त आमच्यासाठीच नाही, तर आरसीबीसाठीही चांगला पाठिंबा मिळाला. खंत एवढीच आहे की, आम्ही त्यांना विजय देऊ शकलो नाहीत. मात्र, त्यांचे धन्यवाद.”
सामन्याविषयी थोडक्यात
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना हेन्रीच क्लासेन याच्या 51 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 104 धावांच्या जोरावर 186 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्याव्यतिरिक्त मार्करम (18), हॅरी ब्रूक (नाबाद 27), यांनीही चांगले योगदान दिले. यावेळी आरसीबीकडून गोलंदाजी करताना मायकल ब्रेसवेल याने 2, तर मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली याने 63 चेंडूत 4 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. तसेच, फाफ डू प्लेसिस यानेही 47 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. त्यांच्यात यादरम्यान पहिल्या विकेटसाठी 172 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे हा सामना आरसीबीने 4 चेंडू शिल्लक ठेवत आणि 187 धावा पूर्ण करत 8 विकेट्सने जिंकला. (aiden markram On defeat said we batted well but could not take full advantage)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिन ते सेहवाग, विराटच्या शतकानंतर ‘या’ 4 दिग्गजांच्या खास प्रतिक्रिया; एबीडी म्हणाला, ‘ते भूकेले…’
विराटच्या शतकावर आख्ख्या जगाने पाडला कौतुकाचा पाऊस, पण पत्नी अनुष्कानं केलेलं कौतुक जगात भारी; वाचाच