2026 च्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. एडन माक्ररमच्या (Aiden Markram) नेतृत्वाखाली या संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही आणि दिमाखात उपांत्य फेरीत (Semi-final) प्रवेश केला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात आफ्रिकेने झिम्बाब्वेचा 5 गड्यांनी पराभव केला. या विजयासोबतच कर्णधार म्हणून माक्ररमने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात कर्णधार म्हणून माक्ररमची कामगिरी थक्क करणारी आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर, तो विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या केन विलियमसनला मागे टाकले आहे. माक्ररमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने 16 पैकी 15 सामन्यांत विजय मिळवला आहे. या यादीत भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी 21 विजयांसह पहिल्या स्थानावर आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार:
एम.एस. धोनी (भारत): 21 विजय (33 सामने)
एडन माक्ररम (दक्षिण आफ्रिका): 15 विजय (16 सामने)
केन विलियमसन (न्यूझीलंड): 14 विजय (21 सामने)
रोहित शर्मा (भारत): 12 विजय (14 सामने)
डॅरेन सॅमी (वेस्ट इंडीज): 12 विजय (18 सामने)
माक्ररम केवळ कप्तानीच नाही, तर फलंदाजीमध्येही चमकदार कामगिरी करत आहे. 2026 च्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 7 सामन्यांत त्याने 53.60 च्या सरासरीने 268 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या तीन अर्धशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आता 4 मार्च रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना करेल.






