मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सुरू आहे. हा सामना जिंकत उभय संघांना कसोटी मालिकेत बाजी मारण्याची संधी आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडलेला भारतीय संघ दुसऱ्या दिवसाच्या (४ डिसेंबर) जेवणाच्या सुट्टीपर्यंत ६ बाद २८५ धावा अशा स्थितीत आहे. नवलाची बाब अशी की, यजमान भारतीय संघाच्या आतापर्यंत पडलेल्या सहाही विकेट्स एकाच गोलंदाजाने घेतल्या असून हा गोलंदाज मूळ भारतीयच आहे.
भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेत न्यूझीलंडकडून फिरकीपटू अजाज पटेल याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. अजाज हा भारतीय वंशाचा क्रिकेटपटू असून त्याचा जन्म हा मुंबईतच झाला होता. या मूळ मुंबईकरानेच भारताच्या पहिल्या डावातील सर्व सहा विकेट्स चटकावल्या आहेत आणि एक खास विक्रमही केला आहे.
तशी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही वेगवान आणि फिरकी, दोन्ही गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. परंतु सहसा कसोटी सामन्याच्या सुरुवातीला वेगवान आणि शेवटी फिरकीपटूंना या खेळपट्टीकडून मदत मिळताना दिसते. मात्र या सामन्यात काही उलट चित्र पाहायला मिळाले. फिरकी गोलंदाज अजाजने सामन्याच्या पहिल्या दिवशीपासूनच भारतीय संघाला धक्के द्यायला सुरुवात केली.
सलामीवीर शुबमन गिल (४४ धावा) त्याची पहिली शिकार ठरला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली अशा अनुभवी शिलेदारांना त्याने शून्यावर तंबूत धाडले. पुढे श्रेयस अय्यर (१८ धावा) त्याचा पहिल्या दिवसातील शेवटचा विकेट ठरला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वृद्धिमान साहा (२७ धावा) आणि आर अश्विन (० धावा) यांच्या त्याने एकाच षटकात सलग २ विकेट्स घेतल्या. यासह त्याने एका डावातील ६ विकेट्सचा आकडा गाठला आहे.
या गोलंदाजी कामगिरीसह अजाज भारतातील कोणत्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा फिरकीपटू बनला आहे. याबाबतीत त्याने जितन पटेल आणि डॅनियल व्हिटोरी यांना मागे टाकले आहे. या दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेत हा पराक्रम केला होता. जितन पटेलने २०१२ मधील हैदराबाद कसोटीतील पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर व्हिटोरीने २०१० आणि १९९९ मधील अहमदाबाद कसोटीत ही कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsNZ, 2nd Test, 2nd Day Live: मयंक दीडशतकाच्या जवळ; लंचब्रेकपर्यंत भारताच्या ६ बाद २८५ धावा
श्रीलंकेच्या वेस्ट इंडिजवरील विजयाने पुन्हा एकदा भारताचे नुकसान, पाहा WTC गुणतालिकेतील सद्यस्थिती
अजिंक्य आणि ईशांतला संघाबाहेर करण्याचे खरे कारण काय? चाहत्यांना पडला प्रश्न