इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप झाला. पहिल्या दिवशी एका धावेवर नाबाद असलेला रहाणे दुसऱ्या दिवशी त्यात भर न घालताच जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. सातत्याने अपयशी होत असलेल्या रहाणेवर यामुळे संघातून गच्छंती होण्याची नामुष्की येऊ शकते. असे झाल्यास, मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याची उपकर्णधार म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.
पुन्हा एकदा अपयशी ठरला रहाणे
ऑस्ट्रेलियामध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात कर्णधार म्हणून समर्थपणे आपली जबाबदारी पार पाडलेला रहाणे सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील सलग दोन सामन्यात तो एकेरी धावसंख्येवर बाद झाला. नॉटिंघम कसोटीच्या पहिल्या डावात ५ व लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात एका धावेवर तो तंबूत परतला.
अखंडित सुरू आहे अपयशाची मालिका
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मेलबर्न कसोटीत शानदार शतक झळकावल्यानंतर रहाणेची बॅट थंडावली आहे. त्या दौऱ्यावरील उर्वरित दोन सामन्यात, त्यानंतर मायदेशात इंग्लंड विरुद्ध झालेल्या चार सामन्यात, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व चालू मालिकेतील दोन सामने अशा ९ सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला. या ९ सामन्यात त्याने १९.२१ च्या मामुली सरासरीने केवळ २६९ धावा काढल्या असून, यामध्ये तो केवळ एक अर्धशतक ठोकू शकला आहे. त्याची अशीच कामगिरी सुरू राहिली तर, लवकरच त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येऊ शकतो.
रोहितची लागू शकते उपकर्णधारपदी वर्णी
रहाणेला संघाबाहेर केल्यास सलामीवीर व मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याच्याकडे उपकर्णधार पद दिले जाऊ शकते. रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत संघातील आपली जागा निश्चित केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! रहाणेचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच चेंडूवर धरली तंबूची वाट, पाहा व्हिडिओ