भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघावर ८ विकेट्सने पराभूत होण्याची नामुष्की ओढावली होती. पण दुसऱ्या सामन्यात संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या झुंजार शतकामुळे भारताने ८ विकेट्सने ऑस्ट्रेलियाला चितपट केले. अशात प्रशिक्षक प्रविण आमरे यांनी रहाणेच्या फलंदाजी फॉर्ममधील सुधारामागचे कारण सांगितले आहे.
“रहाणेने स्वत: सरावाविषयी योजना बनवल्या”
प्रविण आमरे हे अजिंक्य रहाणेचे प्रशिक्षक आणि सल्लागार राहिले आहेत. त्यामुळे प्रविण आमरे आपल्या विद्यार्थ्याच्या या यशाने आनंदित झाले आहेत. त्यांनी आपल्या शिष्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. रहाणेच्या फलंदाजीविषयी बोलताना ते म्हणाले की, “कोरोना व्हायरस महामारीदरम्यान मिळालेल्या सुट्ट्यांमध्ये त्याने स्वत: सराव सत्रांची योजना करुन कसून सराव केला होता. याचेच फळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला मिळाले आहे.”
“यावर्षी रहाणेच्या यशाचे श्रेय त्यालाच जाते. कारण सहसा सर्व खेळाडू प्रशिक्षकाने आखून दिलेल्या सत्रानुसार तयारी करतात. पण कोविड-१९ दरम्यान रहाणेने स्वत: सर्व योजना बनवल्या आणि त्याची अंमलबजावणी देखील केली. या सराव सत्रादरम्यान त्याने खूप मेहनत घेतली आणि एका दिवसात २-२ सत्रात सराव केला. त्याने छोट्यात छोट्या गोष्टींवर मेहनत केली आहे. यश सहजासहज मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, हे त्याने दाखवून दिले आहे,” असे पुढे बोलताना प्रविण आमरे म्हणाले.
ऑस्ट्रेलियाला जाण्यापुर्वी दिला होता संदेश
तसेच ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापुर्वी तुम्ही रहाणेला काय संदेश दिला होता? असा प्रश्न विचारला असता प्रविण आमरे म्हणाले की, “मी त्याला मूलभूत गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. कारण एकावेळी आपण अनेक दौऱ्यांचा विचार नाही करू शकत. एकावेळी एकाच दौऱ्याचा विचार करावा लागतो आणि रहाणेने हेच केले.”
बॉक्सिंग डे कसोटीतील रहाणेची कामगिरी
२६ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत मेलबर्न येथे झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत रहाणेने प्रभावी फलंदाजी केली होती. पहिल्या डावात त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ‘कॅप्टन्स इनिंग’ खेळली होती. २२३ चेंडूंचा सामना करत १२ चौकारांच्या मदतीने ११२ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने २७ धावांची ‘मॅच विनिंग’ खेळी केली होती. यामुळे भारताने तो सामना ८ विकेट्सने खिशात घातला आणि मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. आता पुढील सामना ७ जानेवारीला सिडनी येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी तर केवळ फलंदाज अजिंक्य रहाणेला घडवलं, पण तो कर्णधार झाल्याचे श्रेय त्यालाच”
सिडनी कसोटीवरील चिंतेचे ढग कायम; वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आयोजनावर संभ्रम