भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि फलंदाज अजिंक्य रहाणेला आता नव्या भूमिकेत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. त्याला टी २० मुंबई लीगमधील मुंबई नॉर्थ संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
मुंबई नॉर्थ संघाने अजिंक्य राहाणेवर ७ लाखाची सर्वाधिक बोली लावून त्याला संघात सामील करून घेतले होते. त्यामुळे रहाणे या लीगमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. या लीगसाठी लिलावात रहाणेची मूळ किंमत ४ लाख रुपये होती. पण त्याला त्याच्या मूळ किमतीपेक्षा ३ लाख रुपये जास्त मिळाले आहे.
रहाणे सध्या श्रीलंकेत चालू असलेल्या निदाहास ट्रॉफी या तिरंगी टी २० मालिकेसाठी भारतीय संघात नसल्याने तो टी २० मुंबई लीगमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच रहाणे बरोबर मुंबई नॉर्थ संघात १९ वर्षांखालील विश्वचषक विजेता कर्णधार पृथ्वी शॉचा देखील समावेश आहे.
रहाणेने याआधी २०१५-१६ मध्ये भारताच्या टी २० संघाचे नेतृत्व केले आहे. या दोन सामन्यांपैकी त्याला एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराजयाचा सामोरे जावे लागले आहे.
टी २० मुंबई लीग स्पर्धेत ६ संघांमधील सामन्यांचा थरार प्रेक्षकांना उद्यापासून अनुभवता येणार आहे. ही स्पर्धा २१ मार्च पर्यंत चालू राहणार आहे. तसेच या स्पर्धेतील सर्व सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
Aapla @ajinkyarahane88 – He personifies elegance, calmness, and confidence. Watch him in action at the @T20Mumbai for #NorthMumbaiPanthers #HouDeDanga #CricketChaRaja pic.twitter.com/2dQOR0ksEB
— North Mumbai Panthers (@NMumbaiPanthers) March 9, 2018