भारत-न्यूझीलंड बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची अवस्था अतिशय वाईट झाली. टीम इंडिया अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाली. यानंतर चाहते संघाला ट्रोल करायला लागले आहेत. दरम्यान, भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याची एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, रहाणेनं जुलै 2023 पासून भारतासाठी कोणताही सामना खेळलेला नाही.
अजिंक्य रहाणेनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फलंदाजी सरावाचा व्हिडिओ शेअर केला. त्यानं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “मी स्ट्राईकसाठी तयार आहे”. क्रिकेट चाहते या व्हिडिओला टीम इंडियाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या अपयशाशी जोडत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहते भारतीय फलंदाजांना ट्रोल करत आहेत. काही चाहत्यांनी रहाणेवर देखील टीका केली. तो आताच अशी पोस्ट करून बीसीसीआयवर निशाणा साधत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. अनेक चाहत्यांनी आगामी बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी रहाणे आणि पुजारा यांना टीम इंडियात संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. तुम्ही रहाणेची ही पोस्ट येथे पाहू शकता.
View this post on Instagram
36 वर्षीय अजिक्य रहाणेनं भारतासाठी शेवटचा कसोटी सामना जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात तो केवळ एका डावात फलंदाजी करू शकला, ज्यात त्यानं 8 धावा केल्या. तसं पाहिलं तर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अजिंक्य रहाणेचा रेकॉर्ड खूप चांगला राहिला आहे. त्यानं कांगारुंविरुद्ध 18 सामन्यांमध्ये 1225 धावा केल्या. यात 2 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.
2020-21 बॉर्डर-गावस्कर मालिकेत टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालीच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. मालिकेतील पहिल्या सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर टीम इंडियानं शानदार कमबॅक करत विजय नोंदवला होता.
हेही वाचा –
टी20 विश्वचषकातील सर्वात मोठा अपसेट, 15 वर्षात असं पहिल्यांदाच घडलं!
बंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रिषभ पंत विकेटकिपिंग का करत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं अपडेट
टीम इंडिया अजूनही जिंकू शकते बंगळुरू कसोटी, कराव लागेल फक्त हे काम