---Advertisement---

भारतीय दिग्गजाने सांगितले रहाणेच्या खराब कामगिरीचे कारण; म्हणाला…

On: रविवार, नोव्हेंबर 28, 2021 10:31 PM
---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अनुभवी अजिंक्य रहाणे भारतीय संघाची कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. या कसोटी सामन्यात त्याची कामगिरी विशेष नव्हती. त्याला दोन्ही डावात एकूण ३९ धावा करता आल्या. ग्रीनपार्क, कानपूर येथे झालेल्या या कसोटीत अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावात एजाज पटेलचा बळी ठरला. तो केवळ ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रहाणेच्या खराब कामगिरीवर भारताचा माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा याने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

उजव्या हाताचा फलंदाज अजिंक्य रहाणेने चालू वर्षात फलंदाजीत खराब कामगिरी केली आहे. कसोटीत त्याची सरासरी २० च्या खाली आहे. आतापर्यंत या संपूर्ण वर्षात त्याने एकही शतक झळकावलेले नाही. याआधीही अनेक माजी क्रिकेटपटूंनीही त्याच्या फूटवर्ककडे लक्ष वेधले होते. प्रज्ञान ओझा म्हणाला की, जेव्हा फलंदाजाचे फूटवर्क योग्य नसते तेव्हा तो अडचणीत येतो. त्याने एका वाहिनीला सांगितले की, ”अजिंक्य रहाणे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे असे समजू नका. परंतु त्याच्या खेळीचा तांत्रिक भाग लक्षात घेतला तर त्याच्या फूटवर्कमध्ये खरी अडचण आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही याकडे लक्ष वेधले आहे. जेव्हा तुमचे फूटवर्क चांगले नसेल तेव्हा तुम्ही अडचणीत येऊ शकता.”

पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर रहाणेवर धावा करण्याचे दडपण वाढेल, असेही तो म्हणाला. ”श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले आहे. संघात प्रवेशासाठी दार ठोठावणारा हनुमा विहारीही आहे. दबाव नेहमीच असतो पण जेव्हा तुम्ही वरिष्ठ फलंदाज बनता तेव्हा ते अजून वाढते. जेव्हा तुम्हाला माहित असेल की, एक युवा फलंदाज पदार्पणातच येऊन शतक ठोकतो. विहारीसारखा कोणीतरी आहे जो जेव्हा संधी मिळेल तेव्हा चांगली धावसंख्या करतो. तेव्हा दबाव अजून वाढत जातो.”

प्रज्ञान ओझा म्हणाला की, टीम साऊदी आणि कायले जेमिसन यांनी चेतेश्वर पुजारावर दबाव आणला. तो म्हणाला, ”साऊदी आणि जेमिसन यांनी दुसऱ्या डावात पुजारावर सतत दबाव टाकला. चेंडू आत येतोय की बाहेर जातोय हे पुजाराला कळत नव्हते. हे त्यांना माहीत होतं. उसळी न घेणारे चेंडू कसे खेळायचे याचा विचार पुजारा करत होता. यावरून न्यूझीलंडने किती चांगले नियोजन केले होते हे दिसून येते. कोणती रणनीती वापरायची हे त्यांना माहीत आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---