मुंबई । मुंबईकर स्टार फलंदाज आणि कसोटीपटू अजिंक्य रहाणेने एक खास विक्रम केला आहे. भारताचा ५००वा कसोटी सामना आणि मुंबई संघाचा ५००वा रणजी ट्रॉफी सामना खेळणारा एकमेव खेळाडू म्हणून अजिंक्य रहाणेच्या नावावर यापुढे एक खास विक्रम लावला जाणार आहे.
कालपासून मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यात सुरु असलेला सामना हा मुंबईचा रणजी इतिहासातील ५००वा सामना आहे. रणजी स्पर्धेत दुसरा कोणताही संघ अशी कामगीरी करू शकला नाही. रहाणे सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताकडून खेळत नसल्यामुळे तो मुंबई संघाचा भाग आहे.
२२ ते २६ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय संघ कानपुरयामध्ये न्यूजीलँड विरुद्ध कसोटी सामना खेळला होता. हा भारताचा कसोटी इतिहासातील ५००वा सामना होता. रहाणे हा सामना भारताकडून खेळला होता. त्यात त्याने पहिल्या डावात १८ तर दुसऱ्या डावात ४० धावा केल्या होत्या.
अशी कामगिरी करता येऊ शकते या खेळाडूंना
सध्या दिल्ली (443), तामिळनाडू (436), कर्नाटक (427) आणि हैद्राबाद (412 ) हे संघ ५०० रणजी सामन्यांच्या जवळपास पोहचले आहे. भारताचा ५००वा सामना खेळणारे दिल्लीकर विराट कोहली, शिखर धवन, तामिळनाडूचे मुरली विजय आणि आर अश्विन, तसेच कर्नाटकच्या केएल राहुलला यांना अशी संधी मिळू शकते.
रोहित शर्मा भारताचा ५०० वा सामना खेळला परंतु तो सध्या मुंबईकडून खेळत नसल्यामुळे त्याची ही संधी हुकली.