भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने वनडे संघात परतण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आपण कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार असल्याचे रहाणेने सांगितले आहे.
फेब्रुवारी २०१८नंतर अजिंक्यने एकही वनडे सामना खेळलेला नाही.
३२ वर्षीय रहाणे क्रिकइंफोशी बोलताना म्हणाला, “मी वनडेत कोणत्याही क्रमांकावर खेळायला तयार आहे. अगदी सलामीवीर म्हणून मला संधी मिळाली तरी मी खेळेल. मला माहित नाही की भारतीय संघात कधी संधी मिळेल. परंतु मी सकारात्मक आहे तसेच आपली क्षमता मी ओळखतो. ”
“वनडेत मी सलामीला खेळताना आनंद घेतला आहे, परंतू मला चौथ्या क्रमांकावर खेळायला आवडेल. मी यातील कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. मला माझे मन नक्की म्हणतं आहे की मी वनडेत कमबॅकसाठी तयार आहे,” असेही रहाणे पुढे म्हणाला.
९० वनडे खेळलेला रहाणे पुढे म्हणतो, “काही काळ चौथ्या क्रमांकावर खेळल्यावर सलामीला येणे कठीण असते. त्यातही तिथे स्थिर होणे तर महाकठीण. जे मी केले होते. हे सांगणे कठीण आहे की कोणती जागा चांगली आहे परंतू मी दोन्ही जागी चांगली फलंदाजी करु शकतो.”
असे असले तरी रहाणेसाठी हे कमबॅक नक्कीच सोप्पे असणार नाही. कारण भारतीय संघात सध्या सलामीला तगडे फलंदाज आहेत. शिवाय युवा फलंदाजही तेथे जागा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवाय चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यर स्थिरावत आहे.