भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज व कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. आपल्या नेतृत्वाविषयी तसेच आपल्या कारकीर्दीविषयी त्याने काही अत्यंत महत्त्वाची विधाने केली आहेत (Ajinkya Rahane Statements). त्यानंतर आता त्याने आपल्या वनडे कारकीर्दीविषयी देखील एक खुलासा केला आहे.
काय म्हणाला रहाणे?
अजिंक्य रहाणे यांनी वरिष्ठ पत्रकार बोरिया मजुमदार यांच्या ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या कार्यक्रमात बोलताना काही धक्कादायक गोष्टींचे खुलासे केले. त्याने याच कार्यक्रमात बोलताना आपल्या वनडे कारकीर्दीविषयी एक गंभीर वक्तव्य केले. तो म्हणाला,
“मला वनडे संघातून अचानकपणे बाहेर केले गेले. मी सातत्याने चांगली कामगिरी करत आलो होतो. २०१४, २०१५, २०१६ व २०१७ याकाळात मी नियमितपणे संघाचा भाग होतो तसेच कसोटी व वनडेत धावाही केलेल्या. मात्र, मला अचानक संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. गेम टाईमही अत्यंत कमी मिळाला. कसोटी मालिकांमध्ये मोठा कालावधी असल्याने धावांसाठी झगडावे लागते.”
अजिंक्य रहाणे याने २०११ इंग्लंड दौऱ्यावेळी वनडे पदार्पण केले होते. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत आत्तापर्यंत ९० वनडे सामने खेळताना ३५.२६ च्या सरासरीने २,९६२ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके व २४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने आपला अखेरचा वनडे सामना फेब्रुवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत केला धक्कादायक खुलासा
याच कार्यक्रमात रहाणे याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत खुलासा केला होता. २०२१ च्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत भारतीय संघ ०-१ कसा पिछाडीवर असताना रहाणेने दमदार नेतृत्व करत संघाला २-१ असा विजय मिळवून दिला होता. मात्र, आपल्याला या दौऱ्यावेळी घेतलेल्या निर्णयाचे श्रेय दिले गेले नाही, असे रहाणे म्हटला. तसेच, आपण लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू असा देखील त्याने विश्वास व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजीत फ्लॉप, तरी रोहित-शिखरने रचला इतिहास! ‘असा’ कारनामा करणारी पहिलीच सलामी जोडी
आयपीएल लिलावापूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! ३ खेळाडूंच्या गोलंदाजीवर बंदी, तर १० जणांवर करडी नजर