टीम इंडिया आणि इंग्लंड (IND vs ENG) संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे, तसेच यामध्ये टीम इंडिया (Team india) सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. या सामन्यात आकाशदीपने चांगली कामगिरी केली आहे. आकाशदीप हा तोच खेळाडू आहे, ज्याचं प्लेइंग-11 मध्ये स्थान पक्कं नव्हतं.
दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती दिली जाणार असल्याची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा सगळ्यांना वाटलं की, अर्शदीप सिंग (Arshdeep singh) कसोटी सामन्यात पदार्पण करेल. पण कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) आकाशदीपवर विश्वास दाखवला आणि त्याला एजबेस्टन कसोटी सामन्यात संधी दिली. या संधीचं सोनं करत आकाशदीपने आपल्या घातक गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांचे होश उडवले आहेत.
या सामन्यात इंग्लंड 608 धावांचा पाठलाग करत आहे. शेवटच्या दिवशी पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. पण पाऊस थांबताच आकाशदीपने कहर करत इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलाच त्रास दिला आहे.
पाचव्या दिवशी आकाशदीपने सगळ्यात आधी ओली पोपला बाद केलं आणि लगेचच हॅरी ब्रूकलाही माघारी पाठवलं. या दोन झटक्यांनी इंग्लंड पूर्णपणे दबावाखाली गेलं आहे. त्यांनी अवघ्या 80 धावांत 5 खेळाडू गमावले आहेत. या डावात आकाशदीपने एकूण 4 विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या दिवशीही त्याने 2 विकेट्स घेतल्या होत्या.
दुसऱ्या डावात 608 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडविरुद्ध आकाशदीपने सगळ्यात आधी बेन डकेटला (Ben Duckket) क्लीन बोल्ड केलं. डकेट अवघ्या 25 धावा करू शकला. त्यानंतर त्याने जो रूटलाही जबरदस्त इनस्विंग चेंडूवर क्लीन बोल्ड केलं आणि इंग्लंडला मोठा धक्का दिला.
पाचव्या दिवशी आकाशदीप पुन्हा मैदानात आला आणि पुन्हा त्याने इंग्लंड फलंदाजांची झोप उडवली. सगळ्यात आधी त्याने ओली पोपला क्लीन बोल्ड केलं आणि काही मिनिटांतच हॅरी ब्रूकला एलबीडब्ल्यू करत बाद केलं.
भारतासाठी दुसऱ्या डावात आकाशदीपने 4 तर मोहम्मद सिराजने 1 विकेट्स घेतली आहे. टीम इंडिया (Team india) सध्या विजयाच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यांना फक्त 5 विकेट्सची आवश्यकता आहे. तसेच अजून साधारण 70 षटकांचा खेळ बाकी आहे.