इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाचा आणि नॉर्थम्प्टनशायर सारख्या दिग्गज काउंटी संघाचा माजी कर्णधार अॅलेक्स वेकली याने बुधवारी सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली. नॉर्थम्प्टनशायरचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असलेल्या वेकलीने 371 वेळा संघाचे प्रतिनिधित्व केले आणि 12 हजार पेक्षा जास्त धावा देखील बनवल्या आहेत.
वेकली याने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “मी माझ्या कारकीर्दीचा खूप आनंद लुटला आहे. मी हा खेळ इतकी वर्ष खेळू शकलो याबद्दल आभारी आहे. माझ्या मार्गावर अनेक चढ-उतार होते पण मी नेहमी नॉर्थम्प्टनशायर साठी माझे 100 टक्के देण्याचा प्रयत्न केला.” नॉर्थम्प्टनशायर क्लबने वेकलीला अनेक वर्ष संघात संधी दिल्याबद्दल देखील त्याने त्यांचे आभार मानले आहे.
वेकली पुढे म्हणाला, “क्लबने मला वर्षानुवर्षे दिलेल्या सर्व संधीबद्दल मी त्यांचे कधीही पूर्ण आभार मानू शकत नाही. विशेषत: मुख्य प्रशिक्षक डेव्हिड रिप्ले, ज्यांनी मला मदत केली, प्रोत्साहन दिले आणि पाठिंबा दिला. ते एका प्रशिक्षकाऐवजी माझे मित्र बनले आहेत आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे.”
वेकली हा आपल्या क्लबच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने टी-20 ब्लास्ट 2013 आणि 2016 मध्ये विजेतेपद जिंकले आहे. नॉर्थहॅम्प्टनशायर येथील अकॅडमीचा खेळाडू असलेला वेकली याने 2005 मध्ये आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात केली होती. त्याने आपल्या संपूर्ण क्रिकेटच्या प्रवासात 198 वेळा क्लबचे नेतृत्व केले आहे.
क्लबचे अध्यक्ष गॅविन वॉरेन म्हणाले की, “वेकली हा बर्याच वर्षांपासून नॉर्थहेम्प्टनशायर काउंटी क्रिकेट क्लबचा एक अविभाज्य भाग राहिला आहे, आणि आम्ही त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल त्याला शुभेच्छा देतो.” ते पुढे म्हणाले की,” डेव्हिड रिप्लेबरोबरच्या त्याच्या सुरुवातीच्या काळात, वेकलीने क्लबच्या मैदानावरील अविश्वसनीय कामगिरीत महत्वाची भूमिका बजावली आहे. 2013 आणि 2016 मध्ये करंडक जिंकणे ही एक मोठी कामगिरी होती.”
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत बांग्लादेशी खेळाडूंची मोठी झेप, यांना टाकले मागे
चाहत्यांच्या उत्साहाला येणार उधाण! या सामन्यात दिसणार १८ हजार प्रेक्षक
स्मृती मंधाना बनली आत्मनिर्भर, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ