ट्यूरिन येथे रविवारी(२१ नोव्हेंबर) एटीपी फायनल्स स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेव विरुद्ध रशियाच्या डॅनिल मेदवेदेव यांच्यात पार पडला. या सामन्यात झ्वेरेवने विजय मिळवत दुसऱ्यांदा एटीपी फायनल्सचे विजेतेपद जिंकले आहे.
२४ वर्षीय झ्वेरेवने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मेदवेदेवला ७५ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात ६-४,६-४ अशा फरकाने पराभूत केले आणि विजेतेपदावर नाव कोरले. झ्वेरेवसाठी ही दुसरे एटीपी फायनल्सचे विजेतेपद असून त्याने पहिले विजेतेपद लंडनमध्ये २०१८ साली जिंकले होते.
झ्वेरेवने अंतिम सामन्यात मेदवेदेवला पराभूत करण्यापूर्वी उपांत्य फेरीत अव्वल क्रमांकावरील नोवाक जोकोविचला पराभूत केले होते. त्यामुळे झ्वेरेव असा चौथाच टेनिसपटू ठरला आहे, ज्याने एटीपी फायनल्स स्पर्धेच्या इतिहासात जागतिक क्रमवारीत अव्वल २ क्रमांकावर असलेल्या खेळाडूंना उपांत्य आणि अंतिम सामन्यात पराभूत केले. यापूर्वी असा कारनामा इवान लेंडल (१९८२), स्टिफन एडबर्ग (१९८९) आणि आंद्रे आगासी (१९९०) यांनी केला आहे.
या विजेतेपदानंतर झ्वेरेव म्हणाला, ‘हे खूप मस्त आहे. मी त्या खेळाडूविरुद्ध अंतिम सामना जिंकलो, ज्याविरुद्ध मी गेले ५ सामने सलग पराभूत झालो होतो. त्यामुळे मला हा सामना सर्वोत्तम खेळावा लागला. मला याचा आनंद आहे आणि या विजयासह मी आता सुट्टीवर जाणार आहे.’
विशेष म्हणजे याच स्पर्धेत साखळी फेरीत २५ वर्षीय मेदवेदेवने झ्वेरेवला ६-३, ६ (३) -७, ७-६ (६) अशा फरकाने पराभूत केले होते. झ्वेरेवने वर्षाचा शेवट क्रमवारीत तिसरा क्रमांक भक्कम करत केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर, विम्बल्डनबाबतही दिली महत्त्वपूर्ण अपडेट
असेच मोठे खेळाडू घडत नाहीत! जेव्हा दंगलीची पर्वा न करता गुवाहाटीला पोहोचली होती सानिया, वाचा किस्सा