मुंबई । कोलकाता नाइट रायडर्सने 29 वर्षीय अमेरिकन वेगवान गोलंदाज अली खानला त्यांच्या संघात सामील केले आहे. यासह, आयपीएलमध्ये खेळणारा तो पहिला अमेरिकन खेळाडू ठरला आहे. अली खानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला आहे.
केकेआरच्या हॅरी गार्नीला खांद्याच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागली, ज्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अली खान केकेआर संघात सामील होईल. अली खानने नुकत्याच वेस्ट इंडिजमध्ये खेळवल्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेतला होता. या लीगमधील चॅम्पियन संघ ट्रिबॅंगो नाइट रायडर्सचा तो सदस्य होता.
अली खान आपला टीकेआर संघाचा सहकारी ड्वेन ब्राव्हो आणि प्रशिक्षक ब्रँडम मॅकलम यांच्यासह युएईला रवाना झाला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज ब्राव्होबरोबर एक फोटो शेअर करुन आनंद व्यक्त करत लिहिले की, “पुढचे ठिकाण दुबई!”
गेल्या तीन वर्षांत, अली खान जगभरातील अनेक मोठ्या लीगमध्ये खेळला आहे. यावर्षी त्याचा समावेश सीपीएलच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये झाला. टीकेआरकडून खेळत त्याने आठ सामन्यांमध्ये 7.43 च्या इकोनॉमीसह आठ विकेट्स घेतल्या. मागील वर्षीदेखील तो कोलकाता नाईट रायडर्सच्या नजरेत होता परंतु त्याच्याकडून कोणताही करार निश्चित होऊ शकला नव्हता.
2018 2020 🏆🏆 what a legend @bachaji23 @TKRiders @CPL ❤️🖤 pic.twitter.com/nwKdyKPAfA
— Ali khan (@IamAlikhan23) September 11, 2020
खानची खासियत म्हणजे त्याचा वेग. तो 140 किमीपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करू शकतो आणि टीकेआरकडून खेळताना डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली होती. तो यॉर्कर स्पेशलीस्ट मानला जातो. खानला आयपीएलमध्ये आणण्याचे श्रेय ड्वेन ब्राव्होला जाते. या दोघांची भेट टी -20 ग्लोबल लीगमध्ये झाली होती.