पुणे। रोईल फर्नांडीसने ऋषिकेश माळीला तर सुदर्शन भुतडा यांनी राज सिंग यांना पराभूत करताना अनुक्रमे ४५ वर्षांखालील गटाचे व ४५ वर्षांवरील गटाचे विजेतेपद पटकावले. त्याबरोबरीने सुदर्शन भुतडा व श्रीनिवास देवस्थळे यांच्या जोडीने माधव बापट व शशांक टिळक यांच्या जोडीला पराभूत करतना ४५ वर्षांवरील गटाचे विजेतेपद साकारले.
शिवाजीनगर येथील पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हॉल येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेचे बक्षीस वितरण आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व पंच मंजुषा सहस्त्रबुद्धे व टोयो इंडियाचे संचालक के. एस. मूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र जोशी, उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकर, सचिव अतुल वाडकर, संघटनेच्या बॅडमिंटन समितीचे अध्यक्ष विनय कळसकर, मुख्य समन्वयक तारक पारीख, सचिव सुदर्शन भुतडा, प्रवीण पवार, विक्रम गोगावले, संजय भोपे, कृष्णा जागडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
४५ वर्षांखालील गटाच्या अंतिम लढतीमध्ये रोईल फर्नांडीसने ऋषिकेश माळीला १५-७ , १५-५ असे पराभूत करताना विजेतेपदाला गवसणी घातली. ४५ वर्षांवरील गटाच्या अंतिम सुदर्शन भुतडा यांनी राज सिंग यांना १५-११, १५-८ असे पराभूत करताना विजेतेपद साकारले.४५ वर्षांवरील गटाच्या दुहेरीत सुदर्शन भुतडा व श्रीनिवास देवस्थळे यांच्या जोडीने माधव बापट व शशांक टिळक यांच्या जोडीला १५-९ , १५- १२ असे पराभूत करताना विजेतेपद मिळविले. ४५ वर्षांखालील गटाच्या अंतिम लढतीत श्रीनिवास देवस्थळे व सुदर्शन भुतडा यांनी रोईल फर्नांडीस व तरुण शेट्टी यांच्या जोडीला यांना १५-९, १५-१२ असे पराभूत केले.