भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे, टी20 आणि कसोटी सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी गेला आहे. या दौऱ्यात 3 वनडे, 3 टी20 आणि 4 कसोटी सामने होणार आहेत. कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होईल. पण याचदरम्यान कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली भारतात परतणार आहे. जानेवारी 2021 मध्ये तो आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा पहिल्यांदाच पालक बनणार असल्याने विराटने पहिल्या कसोटीनंतर पालकत्व रजा घेतली आहे.
पण आता याबद्दल ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ऍलेन बॉर्डर यांनी गमतीने म्हटले आहे की विराटच्या मुलाचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये व्हावा अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरुन नंतर त्याला ऑस्ट्रेलियन म्हटले जावे. खरंतर बॉर्डर विराटचे चाहते आहेत.
बॉर्डर यांनी एका मुलाखतीत गमतीने सांगितले की, ‘आम्हाला आशा होती की त्याच्या मुलाचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये होईल. त्यातून नंतर आम्ही दावा करू शकतो की तो ऑस्ट्रेलियन आहे. ‘
65 वर्षीय बॉर्डरने सांगितले की, मालिकेत विराटचा फक्त एक कसोटी सामना खेळणे ऑस्ट्रेलियासाठी फायदेशीर आहे. ‘ऑस्ट्रेलियाच्या बाजूने एकच गोष्ट आहे की विराट फक्त पहिला कसोटी सामना खेळेल. मला वाटते की भारतासाठी हा मोठा धक्का आहे. फलंदाज म्हणून तो याक्षणी कमालीचा खेळ करित आहे. तसेच त्याचे नेतृत्वही चांगले आहे,’ असे बॉर्डर म्हणाले
विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पुढच्या वर्षी जानेवारीत त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. यावेळी विराटला आपल्या कुटुंबासमवेत रहाण्याची इच्छा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एबीडी पुन्हा झाला बाबा ! सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुड न्यूज
विराट कोहलीच्या अनुपस्थितीबाबत रिकी पाँटिंगने भारतीय संघव्यवस्थापनाला विचारले प्रश्न