इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या ७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने (सीएसके) प्रथम फलंदाजी करत २१० धावा केल्या. ही धावसंख्या उत्तम असली, तरी खराब गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. शेवटच्या षटकांमध्ये सीएसकेने ज्याप्रकारे गोलंदाजी केली, ती पाहता संघाला जिंकणे कठिण झाले होते. सीएसके संघाने आत्तापर्यंत २० वेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावसंख्या केली आहे. यामध्ये संघाला फक्त दोनवेळा अपयश आले आहे. या लेखात आपण लखनऊ संघाविरुद्ध सीएसकेला अपयश येण्यामागची ५ कारणे जाणून घेणार आहोत.
१. राहुल आणि डिकाॅकची शानदार खेळी
लखनऊ संघाला सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात देत ९९ धावांची भागिदारी केली. केएल राहुल (KL Rahul) पहिल्या सामन्यात शुन्यावर बाद झाला होता, परंतु सीएसकेविरुद्ध त्याने २६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. तसेच क्विंटन डी काॅकने ४५ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. या दोघांच्या शानदार खेळीमुळे सीएसके संघाने ठेवलेले लक्ष्य लखनऊने सहजपणे गाठले.
२. शिवम दूबेला १९ वे षटक देणे पडले महागात
लखनऊ संघाला शेवटच्या २ षटकांत विजयासाठी ३४ धावांची गरज होती. तेव्हा १९ वे षटक महत्त्वपूर्ण होते. सीएसकेचा कर्णधार रविंद्र जडेजाने शिवम दूबेला ते षटक दिले. या षटकात लखनऊने २५ धावा केल्या, तेव्हाच सामना चेन्नईच्या हातून जवळपास निसटला.
३. मुकेश चौधरीच्या शेवटच्या षटकात २ वाइड चेंडू
शेवटच्या षटकात लखनऊला विजयासाठी ९ धावांची गरज होती. २० वे षटक टाकण्यासाठी मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) आला आणि त्याने पहिले दोन चेंडू वाइड टाकले. त्यामुळे लखनऊ संघाला फक्त ७ धावांची गरज होती. त्या लखनऊ संघाने ३ चेंडूतच केल्या आणि सीएसकेला पराभूत केले. चौधरीने ३.३ षटकात ३९ धावा दिल्या.
४. आयुष बदोनीची १९ व्या षटकात महत्त्वपुर्ण खेळी
लखनऊसाठी आयुष बदोनीने ९ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने १९ धावा केल्या. त्याने पहिल्या सामन्यात देखील अर्धशतकी खेळी खेळली होती. त्याने १९ व्या षटकात एव्हिन लुईसबरोबर भागीदारी करताना २५ धावा करण्यात महत्त्वपुर्ण भूमीका बजावली.
५. दुसऱ्या डावात दवामुळे झालेला फरक
सीएसकेसाठी दूसऱ्या डावात गोलंदाजी दवामुळे चांगली होऊ शकली नाही. आयपीएलच्या या हंगामात आणि खास करुन महाराष्ट्रातील स्टेडियममध्ये दूसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे जाते. दवामुळे चेंडू ओला होतो, त्यामुळे फिरकी गोलंदाजांना चेंडू वळवायला कठीण जाते. या सामन्यात सीएसकेचे फिरकी गोलंदाज संघर्ष करताना दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्याा-
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल कोलकाता वि. पंजाब सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय