भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) यांच्यात दुसरा टी20 सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर) नागपूर येथे खेळला गेला. पावसामुळे खेळपट्टी ओली झाल्याने सामन्याला तब्बल अडीच तास उशिर झाला. यामुळे हा सामना प्रत्येकी 8-8 षटकांचा खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली, मात्र हर्षल पटेल याने नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे.
अक्षर पटेल आणि विराट कोहली यांनी कॅमरून ग्रीन याला धावबाद करत संघाला चांगली सुरूवात करून दिली, तर संघपुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच (31) याला त्रिफळाचीत केले. यावेळी बाकी भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला 90 धावांवर रोखले. अष्टपैलू अक्षर पटेलने पहिल्या दोन षटकात ग्लेन मॅक्सवेल व टीम डेव्हिड यांना बाद करत ऑस्ट्रेलियाला शतकी धावसंख्येपासून दूर ठेवले. असे असले तरी भारताच्या एका खेळाडूने निराशाजनक कामगिरी केली आहे.
मागील सामन्यात मॅचविनिंग खेळी केलेल्या मॅथ्यू वेड याने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी केली. त्याने वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) याच्या अखेरच्या षटकात तीन षटकार लगावत ऑस्ट्रेलियाला 90 धावांपर्यंत पोहचविले. हे तीन षटकारच हर्षलचा नकोश्या यादीत समावेश होण्यास कारणीभूत ठरले आहे.
यावर्षी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ज्या गोलंदाजाविरुद्ध फटकारले त्या यादीत हर्षल पहिल्या स्थानावर आहे. यावर्षी आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी 31 षटकार मारले आहेत. तसेच या यादीमध्ये वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज रोमारियो शेफर्ड याचा दुसरा क्रमांक लागतो. त्याच्या गोलंदाजीवर 23 षटकार मारले गेले आहेत. यामध्ये हर्षल बरोबरच भारताच्या आणखी तीन खेळाडूंचा समावेश आहे. आवेश खान (21), युझवेंद्र चहल (20) आणि हार्दिक पंड्या (20) यांचेही या यादीत नाव आहे.
हर्षलचा आगामी दक्षिण आफ्रिका टी20 मालिका आणि टी20 विश्वचषकाच्या भारतीय संघातही समावेश आहे, मात्र त्याच्या कामगिरीमुळे संघव्यवस्थापकांची चिंता वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये गोलंदाजाला मारलेले षटकार (2022)
31 – हर्षल पटेल
23 – रोमारियो शेफर्ड
21 – आवेश खान
21 – जेसन होल्डर
20 – मार्क अदेर
20 – युझवेंद्र चहल
20 – हार्दिक पंड्या
हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला. यामुळे तीन सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvAUS: रोहितचा पहिलाच षटकार ठरला विक्रमी! आंतरराष्ट्रीय टी20मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा एकमेव भारतीय
रॉजर फेडररचा इमोशनल बाय-बाय! राफेल नदाल, नोवाक जोकोविच यांना देखील अश्रू अनावर
चेन्नईच्या रखरखत्या उन्हात डीन जोन्सनी केली होती भारताविरुद्ध अफलातून खेळी