अल्वारो मोराटा या नवीन मोसमपासून चेल्सी संघाकडून खेळणार आहे. चेल्सी संघाने मोराटाला ११६ मिलियन डॉलर इतकी मोठी रक्कम देऊन संघासाठी करारबद्ध केले आहे. चेल्सी संघाकडे आधीपासून खूप मोठे खेळाडू होते. संघ यावर्षीचा प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ असल्याने ते या वर्षीच्या युइफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यंदा त्यांचा मनसुबा युइफा चॅम्पियन्स लीग जिंकण्याचा आहे, म्हणनू त्यांना संघात प्रभावी स्ट्रायकर्स हवे आहेत जे स्पॅनिश संघाना धूळ चारू शकतील.
मागील चार वर्षात युइफा चॅम्पियन्स लीगचे चारही विजेतेपद स्पॅनिश संघानी जिंकली आहेत. त्यापैकी तीन रिअल माद्रिदने तर २०१४-१५ मोसमात बार्सेलोनाचा संघ विजेता होता. अल्वारो मोराटा हा रिअल माद्रिदचा दुसऱ्या फळीतील खेळाडू होता, ज्याला मुख्य संघात बऱ्याच वेळा खेळवले जात नसे आणि त्यामुळेच त्याने माद्रिद सोडण्याचा निर्णय घेतलेला असावा.
२०१३-१४ साली अल्वारो मोराटाला जुवेंटस संघाने माद्रिदकडून विकत घेतले होते. युइफा चॅम्पियन्स लीगच्या सेमी फायनल माद्रिद आणि जुवेंटस यासंघांमध्ये झाली होती, तेव्हा पहिल्या लेगमध्ये अल्वारो मोराटा याने जुवेंटसला बढत मिळवून दिली आणि पहिला लेग जुवेंटसने २-१ अशा फरकाने जिंकला. तर दुसऱ्या लेगमध्ये जुवेंटस आणि माद्रिद दोघांनी १-१ गोल केले होते, त्यात मोराटाने गोल केला आणि जुवेंटस गोल फरकाच्या आधारे जिंकली आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. पण मोराटाने दोन्ही गोल केल्यावर आनंद व्यक्त केला नव्हता आणि आपण आपल्या जुन्या संघाशी अजून बांधील आहोत हे दाखवले होते. त्याला परत माद्रिद संघाने करारबद्ध केले आणि दोन वर्ष संघासोबत ठेवले.
आपल्याला माद्रिद संघातून पुरेशी संधी मिळत नसल्याने त्याने चेल्सी संघासोबत करार मान्य केला आणि तो आता आपल्या आवडत्या जर्सी नंबर ९ सोबत चेल्सी संघाकडून खेळणार आहे.
फुटबॉलमध्ये का आहे नंबर ९ ला इतके महत्व
फुटबॉलमध्ये नंबर १०ची जर्सी खूप महत्वाची मानली जाते कारण ती संघातील सर्वात मुख्य खेळाडूला दिली जाते. पण संघासाठी जो मुख्य स्ट्रायकर असतो त्याला नंबर ९ जर्सी दिली जाते. या अगोदर स्पॅनिश खेळाडू फर्नांडो टोरेस याला चेल्सीने नंबर ९ जर्सी दिली होती आणि त्याने चेल्सी संघासाठी युइफा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून दिले आहे.