भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे, जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटूंपैकी एक असलेला लिओनेल मेस्सी अर्जेंटिना फुटबॉल संघासोबत भारतात येणार आहे. यावर्षी अर्जेंटिना संघ सामने खेळण्यासाठी येईल. मेस्सीने शेवटचा 2011 मध्ये भारत दौरा केला होता, आता 14 वर्षांनंतर हा फुटबॉल स्टार भारतात परत येत आहे.
भारतात फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी एचएसबीसी इंडियाने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनसोबत करार केला आहे. या करारानुसार, अर्जेंटिना राष्ट्रीय फुटबॉल संघ भारतात एक मैत्रीपूर्ण सामना खेळेल.
एचएसबीसी इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, “अर्जेंटिना राष्ट्रीय फुटबॉल संघ ऑक्टोबर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीय सामन्यासाठी भारताचा दौरा करेल. या संघात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचाही समावेश असेल.”
🚨 LIONEL MESSI IN INDIA 🚨
— Tanuj (@ImTanujSingh) March 26, 2025
– Lionel Messi & Argentina team will visit India to play an exhibition match in Kerala in October. (Sportstar). pic.twitter.com/89sUaiVWb6
करारानुसार, अर्जेंटिना संघ या वर्षी ऑक्टोबरमध्ये एक मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी भारतातील केरळ राज्यात येईल. हा सामना केरळमधील कोची येथे खेळला जाईल.
लिओनेल मेस्सीने शेवटचा सप्टेंबर 2011 मध्ये भारताचा दौरा केला होता. त्यावेळी अर्जेंटिना फुटबॉल संघाने कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमवर व्हेनेझुएला संघाविरुद्ध सामना खेळला होता. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये अर्जेंटिनाने 1-0 असा विजय मिळवला.
आज खेळल्या गेलेल्या सामन्यात अर्जेंटिना फुटबॉल संघाने ब्राझीलचा 4-1 असा पराभव केला. या विजयासह, अर्जेंटिना पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. तथापि, वैयक्तिक कारणांमुळे, लिओनेल मेस्सी या सामन्यात खेळला नाही. 2026 च्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा अर्जेंटिना हा पहिला दक्षिण अमेरिकन संघ आहे.