भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला सुरुवात होत आहे. मागच्या दौऱ्यात विजय मिळवलेल्या भारतीय संघासमोर यावेळी काहीसे मोठे आव्हान असणार आहे. मालिका सुरू होण्याआधी झालेल्या दोन सराव सामन्यात भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय राहिली. दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया अ संघावर वर्चस्व गाजवत, आत्मविश्वास मिळवला आहे. या सराव सामन्यात भारताच्या हनुमा विहारीने शतक झळकावत पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात आपली जागा पक्की केली. या दौऱ्यासाठी मी तयारी करून आलो, असे विहारीने म्हटले आहे.
मी तयारी करून आलो आहे
रविवारी (१३ डिसेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीनदिवसीय सराव सामना अनिर्णित राहिला. भारताकडून या सामन्यात यष्टीरक्षक रिषभ पंत व मधल्या फळीतला फलंदाज हनुमा विहारी यांनी शतके झळकावली. भारतासाठी या दोघांचे फॉर्ममध्ये येणे चांगले संकेत आहेत. याच खेळीसह विहारीने पहिल्या कसोटीत भारतीय संघात सहाव्या क्रमांकावर आपला दावा ठोकला आहे. आपल्या खेळीनंतर प्रतिक्रिया देताना विहारी म्हणाला, “मागील दौरा हा माझा केवळ दुसरा विदेश दौरा होता. तेव्हा मी थोडेफार योगदान दिले होते. यावेळी मी काहीशी चांगली तयारी करून आलो आहे. मला आशा आहे की, मी यावेळी चांगली कामगिरी करेल. आगामी मालिकेतून मला अपेक्षा आहेत.”
वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते- विहारी
ऍडलेड येथील दिवस-रात्र कसोटीने सुरुवात होणाऱ्या या मालिकेत विहारी भारतासाठी सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो. सराव सामन्यात विहारीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आकर्षक शतक झळकावले होते. आपल्या या खेळीविषयी बोलताना विहारीने म्हटले, “मला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. वरच्या क्रमांकावर फलंदाजी करताना मानसिकता देखील तशीच राहते. मला पुजारासोबत फलंदाजी करायला आवडते. तो कायम सकारात्मक बोलत असतो. पुजारा, रहाणे या खेळाडूंच्या अनुभवाचा मला फायदा होत आला आहे.”
विहारीने आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून भारतीय संघातील आपली जागा कायम ठेवली आहे. मिळालेल्या मर्यादित संधीमध्ये त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत आपली गुणवत्ता दाखवली. आगामी दौऱ्यात भारताला आपले विजेतेपद कायम ठेवायचे असेल तर, विहारीला आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अष्टपैलू कैमरुन ग्रीन भारताविरुद्ध खेळण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने दिले संकेत
युवा खेळाडूंना आयपीएल लिलावापूर्वी मिळणार व्यासपीठ, मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या तारखा जाहीर
“कसोटी मालिका नशिबाने जिंकता येत नाहीत”; ‘या’ खेळाडूने सुनावले टीकाकारांना खडे बोल