टी20 विश्वचषक 2024 चा बिगुल अमेरिकेत वाजला आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेनं कॅनडाचा 7 गडी राखून पराभव केला. यजमानांनी 195 धावांचं लक्ष्य 17.4 षटकांत पार केलं. अमेरिकेसाठी ॲरॉन जोन्सनं 40 चेंडूत 94 धावांची तुफानी खेळी खेळली आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
अमेरिका आणि कॅनडाचा क्रिकेट इतिहास खूप जुना आहे. 180 वर्षांपूर्वी 1844 मध्ये दोन्ही संघांमध्ये पहिला अनौपचारिक आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये कॅनडानं 23 धावांनी विजय मिळवला होता. हा सामना न्यूयॉर्कमधील सेंट जॉर्ज क्लब मैदानावर खेळला गेला होता. 24 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर दरम्यान झालेल्या या ऐतिहासिक सामन्यात कॅनडानं प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात केवळ 82 धावा केल्या होत्या. अमेरिकेतर्फे सॅम राइटनं 5 आणि हेन्री ग्रुमनं 3 विकेट घेतल्या. कॅनडासाठी तीन फलंदाजांनी 12-12 धावांचं योगदान दिलं.
प्रत्युत्तरात, आपल्या पहिल्या डावात अमेरिकेचा संघ केवळ 64 धावांवर बाद झाला आणि कॅनडानं पहिल्या डावात 18 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या डावातही कॅनडाला काही अप्रतिम खेळ दाखवता आला नाही आणि संपूर्ण संघ 63 धावांवर गारद झाला. यावेळी अमेरिकेकडून हेन्री ग्रुमनं 5 बळी घेतले, तर कॅनडाकडून सलामीवीर डेव्हिड विंकवर्थनं सर्वाधिक 14 धावा केल्या.
82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघ पुन्हा एकदा केवळ 58 धावा करू शकला आणि सामना 23 धावांनी गमावला. अमेरिकेकडून सलामीवीर जेम्स टर्नरनं 14 धावा केल्या आणि कॅनडाकडून जॉर्ज शार्पनं 6 बळी घेतले.
डॅलस येथे खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेनं कॅनडाचा 7 गडी राखून एकतर्फी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कॅनडाच्या संघानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 194 धावा केल्या. प्रत्युत्तरात, अमेरिकेनं हे 195 धावांचं लक्ष्य 17.4 षटकांत केवळ 3 गडी गमावून गाठलं. अमेरिकेकडून ॲरॉन जोन्सनं 94 धावांची तुफानी खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात लगावला 103 मीटरचा षटकार! मैदानावरील सर्वच थक्क; पाहा VIDEO
काय करावं ते सुचेना! सराव सामन्यात रिषभ पंतच्या तुफानी खेळीनं गोलंदाजांच्या मनात भरली धडकी
यजमान अमेरिकेची विश्चचषकात विजयाने सुरुवात, कॅनडाचा 7 विकेट्सनी केला पराभव