आयपीएल 2025 स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये राजस्थान रॉयल संघासाठी या हंगामाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने राजस्थानला पराभूत केले. या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात रियान पराग राजस्थानचा पहिला कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने पहिले दोन्ही सामने गमावलेले आहेत.
आतापर्यंत राजस्थान रॉयल्सच्या दोन्ही सामन्यात रियान परागने संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन इम्पॅक्ट प्लेयरच्या स्वरूपात खेळत आहे. संजूच्या अनुपस्थितीत रियान पराग राजस्थानचे नेतृत्व करत आहे, पण कर्णधार म्हणून त्याची सुरुवात चांगली झालेली नाही. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाला 44 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने राजस्थानला 8 विकेट्सने पराभूत केले. याप्रकारे रियानच्या नेतृत्वाखाली राजस्थानला पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
आत्तापर्यंत रियान परागने आयपीएल स्पर्धेतील एकूण 71 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये या अष्टपैलू खेळाडूने 24.04 च्या एवरेजने1202 धावा केल्या आहेत. या स्पर्धेमध्ये रियान परागने 6 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच 83 च्या एव्हरेजने 4 फलंदाजांना बाद देखील केले आहे.
याआधी कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला 8 विकेट्सने पराभूत केले होते. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 9 खेळाडू गमावून 151 धावसंख्या केली होती. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने 17.3 षटकात 2 खेळाडू गमावून विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी क्विंटन डिकॉकने 61 चेंडूत 97 धावांची विजयी पारी खेळली.






