शारजाह। क्रिकेट म्हटलं की नेहमीच खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची चर्चा होत असते. पण, क्रिकेटमध्ये जसे खेळाडू महत्त्वाचे असतात, तसेच क्रिकेट सामना सुरळीत पार पडावा म्हणून पंच महत्त्वाचे असतात. नुकतेच मंगळवारी (५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात ५१ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात सामन्यात भारतीय पंच अनिल चौधरी यांनी मैदानातील पंच म्हणून काम पाहिले. याबरोबरच त्यांनी एक मोठा विक्रम केला आहे.
हा सामना अनिल चौधरी यांच्यासाठी आयपीएलमधील पंच म्हणून १०० वा सामना ठरला. असा पराक्रम करणारे ते दुसरेच पंच ठरले. यापूर्वी असा पराक्रम सुंदरम रवी यांनी केला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १३० आयपीएल सामन्यांत पंच म्हणून काम पाहिले आहे. सर्वाधिक आयपीएल सामन्यांत पंचगिरी करण्याच्या यादीत रवी आणि चौधरी यांच्या पाठोपाठ कुमार धर्मसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी ९४ सामन्यांत पंचगिरी केली आहे.
अनिल चौधरी यांची कामगिरी
अनिल चौधरी हे २०१२ पासून आयपीएलमध्ये पंच म्हणून काम करत आहेत. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही पंच म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी मैदानावरील पंच म्हणून तसेच टीव्ही पंच म्हणूनही काम केले आहे.
त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ कसोटी, ४० वनडे आणि ४३ टी२० सामन्यांत पंचगिरी केली आहे. तसेच महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी ११ वनडे आणि ३ टी२० सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे.
याशिवाय त्यांनी ६३ प्रथम श्रेणी सामन्यांत आणि ८१ अ दर्जाच्या सामन्यांत पंचगिरी केली असून त्यांना तब्बल २०४ टी२० क्रिकेट प्रकारातील सामन्यांत पंच म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. २०४ टी२० सामन्यांपैकी ६२ सामन्यांत ते टीव्ही पंच होते.
मुंबईचा विजय
मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद ९० धावा करत मुंबईला ९१ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान मुंबईने इशान किशनच्या नाबाद ५० धावांच्या खेळीच्या जोरावर ८.२ षटकांत सहज पूर्ण केले. हा मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२१ मधील ६ वा विजय ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ‘असं’ झालं! मुंबईने ९ षटकातच विजय मिळवल्याने राजस्थानवर ओढावली नामुष्की